मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात - प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे



बारामती दि. 30:- पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक -2020 साठी नियुक्त केलेल्या केंद्रप्रमुख, मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी मतदानाच्या दिवशी पार पाडावयाची जबाबदारी विषयक प्रशिक्षण व मतदान प्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्याचे वाटप आज नवीन प्रशासकीय भवन, बारामती येथील बैठक सभागृह मध्ये उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी तहसिलदार विजय पाटील, बारामती नगरपालिका मुख्याधिकारी किरणराज यादव, निवासी नायब तहसिलदार धनंजय जाधव, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विश्वास ओव्हाळ, सर्व केंद्रप्रमुख, मतदान अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
प्रांताधिकारी कांबळे यांनी बारामती तालुक्यातील पदवीधर व शिक्षक मतदार संघ-2020 च्या निवडणुकी बाबत प्राथमिक माहिती दिली. मतदान केंद्र प्रमुख, मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना दिलेली जबाबदारी अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पाडावी, ही निवडणूक कोरोना विषाणूच्या संक्रमण काळात होत असल्याने प्रत्येक मतदान केंद्राला मास्क, सॅनिटायझर, थर्मलस्कॅनर या वस्तूंचा पुरवठा करण्यात येईल. त्यांचा वापर करावा, प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेवकांची नेमणूक करण्यात आली असून सामाजिक अंतर ठेवून मतदान प्रक्रिया पार पाडावी.
यानंतर मतदान प्रक्रियेचे कामकाज कसे पार पाडावे याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. सादरीकरणामध्ये मतदान कक्षाची रचना कशी असेल, मतदान कक्षाचा प्रोटोकॉल कसा पाळावा, मतपेटीचा वापर कसा करावा, विविध प्रकारचे नमुने व अर्ज कसे भरावेत, मतपत्रिका, विविध शिक्के, शाई, स्केच पेन यांचा योग्य ठिकाणी कसा वापर करावा, मतदारांनी कशा प्रकारे मतदान करणे आवश्यक आहे, मतदाराची कोणती ओळखपत्रे तपासण्यात यावीत, संविधानिक, असंविधानिक व इतर लिफाफे यांचा उपयोग कसा करण्यात यावा, मतपेटी कशी सिलबंद करण्यात यावी, मतपत्रिकेची घडी कशी करावी याबाबत सूचना दिल्या. मतदानाचे कोणतेही साहित्य पोलिस संरक्षणाशिवाय इतरत्र हलवता येणार नाही, याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी तसेच मतदानाच्या दिवशी सूक्ष्म निरीक्षक केंद्राला भेट देऊ शकतात. त्यांना संबंधिताने प्रोटोकॉलनुसार आवश्यक ती माहिती पुरविण्यात यावी व त्यांच्या सूचनांचे पालन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सर्वात महत्त्वाची जबाबदारी ही मतदान केंद्रप्रमुखाची आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली मतदान प्रक्रिया पार पडेल. केंद्र प्रमुखांनी भारत निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करुन मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तत्पर रहावे, असेही निर्देश कांबळे यांनी दिले. यानंतर मतदान प्रक्रियेसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याचे वाटप करण्यात आले.
00000

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area