शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाने सराईत मोटरसायकल चोरट्याला केले गजाआड .



 इचलकरंजी/प्रतिनिधी -

 इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाने सराईत मोटरसायकल चोरट्याला गजाआड केले.  किशोर गुंडाप्पा पेटकर (वय 35 रा. संतोषमाता गल्ली जवाहरनगर) असे त्याचे नांव आहे. त्याच्याकडून 75 हजार रुपये किंमतीच्या 3 मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर शहर व परिसरात मोटरसायकल चोरीचे प्रकार वाढले होते. त्या अनुषंगाने तपास सुरु असताना शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाची गस्त सुरु होती. इचलकरंजी ते चंदूर रोडवरील अलायन्स हॉस्पिटलच्या चौकात एकजण विनानंबर प्लेटच्या दुचाकीवरुन जाताना निदर्शनास आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी करता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर कसून केलेल्या चौकशीत त्याने मोटरसायकली चोरल्याची कबुली देत ताब्यातील मोटरसायकल सोन्या मारुती मंदिर येथून चोरल्याचे सांगितले. त्याचबरोबर दहा दिवसापूर्वी शाहू पुतळा परिसरातील आदर्श मंगल कार्यालय व दीड वर्षापूर्वी अंकली (जि. सांगली) येथून प्रत्येकी एक मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातील मोटरसायकलीसह तिन्ही मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई पोलिस निरिक्षक ईश्‍वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक प्रमोद मगर, रफिक पाथरवट, उदय पाटील, प्रशांत ओतारी, प्रकाश कांबळे, महेश पाटील, गजानन बरगाले, विजय माळवदे व अविनाश भोसले ांच्या पथकाने केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area