अल्ट्रा फिल्ट्रेशन वॉटर प्युरिफायसिस्टीम बसवणे अत्यंत चुकीचे व जनतेची फसवणूक करणारे – नगरसेवक शशांक बावचकर

 


इचलकरंजी/प्रतिनिधी –

शहरातील विविध भागात उभारण्यात येणार्‍या शुध्द पेयजल प्रकल्प संदर्भात मंजूर केलेला प्रस्ताव गोंधळाच्या आड बदलण्याचा डाव नगरपरिषदेतील सत्ताधार्‍यांनी चालविला आहे. याबाबत आमदार, नगराध्यक्षा यांना कोणत्याही प्रकारची माहिती नसून स्थायी समितीची शिफारशही घेण्यात आलेली नाही. पाणी तपासणीचे चुकीचे रिपोर्ट सादर करुन त्यावर अल्ट्रा फिल्ट्रेशन वॉटर प्युरिफायसिस्टीम बसवणे अत्यंत चुकीचे व जनतेची फसवणूक करणारे आहे. ठराविक मक्तेदारांचे हित साधणार्‍या आणि शासनाच्या पैशाचा अपव्यय करणार्‍या प्रस्तावाला मान्यता देऊ नये अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात, इचलकरंजीकरांना मोफत 24 तास शुध्द पाणी देण्याच्या उदात्त हेतुने आमदार प्रकाश आवाडे यांनी शहरातील विविध भागात 100 पेयजल प्रकल्प उभारण्याचा संकल्प केला. त्यासाठी आवश्यक 4 कोटी रुपयांचा निधीही शासनाकडून नगरपरिषदेला मिळवून दिला. या संदर्भातील नगरपरिषदेच्या 31 डिसेंबर 2019 च्या सभेत या विषयावर पुढील मिटींगमध्ये निर्णय घेण्याचे सर्वानुमते ठरले होते. परंतु 30 जानेवारी 2020 रोजी झालेल्या सभेमध्ये झालेल्या प्रचंड गोंधळातच सत्ताधारी गटाने हा विषय मंजूर करण्यासह विविध भागामध्ये रिव्हर्स ओसमोसीस वॉटर प्युरिफायर सिस्टीम बसविणेचा ठराव मंजूर करुन सदरचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजूरीसाठी पाठविला. शासनाने सदरच्या प्रस्तावाला 11 जुन 2020 रोजी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजूरी दिली. मात्र अचानकपणे नगरपरिषदेने आरओ सिस्टीम ऐवजी युएफ सिस्टीम प्युरिफायर बसविणेचा निर्णय घेऊन सदरचा प्रस्ताव मान्यतेसाठी जिल्हा प्रशासन अधिकार्‍यांकडे पाठवल्याचे समजते. हा निर्णय घेत असताना नगरपरिषदेने पाणी पुरवठा समिती, स्थायी समिती अथवा सर्वसाधारण सभेमध्ये कोणतीही चर्चा केली नाही. सभागृहाला अंधारात ठेवून केवळ ठराविक मक्तेदारांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचे दिसून येते.

शहरातील वेगवेगळया भागातील उपलब्ध असणार्‍या बोअरवेलची पाणी पातळी व त्यामध्ये असलेले क्षारांचे प्रमाण हे अत्यंत घातक पातळीवर असलेचे दिसून येते. ‘निरी’ने दिलेल्या अहवालामध्ये इचलकरंजीतील एकूण प्रदूषाणाचे प्रमाण व बोअरवेलमधील क्षारांचे प्रमाण याबाबत गंभीर चिंता व्यक्त करत अंदाजे 550 बोअरवेल पिण्याच्या पाण्यासाठी योग्य नाहीत असा निष्कर्ष काढला होता. तर नगरपरिषदेने 2013-14 साली केलेल्या शहराच्या पर्यावरण दिशादर्शक अहवालात पाण्याची पातळी व असणारे क्षारांचे प्रमाण याबाबत स्पष्टपणे सुचना दिलेल्या होत्या. असे असताना पाणी तपासणीचे चुकीचे रिपोर्ट सादर करुन त्यावर अल्ट्रा फिल्ट्रेशन वॉटर प्युरिफायर सिस्टीम बसवणे हे अत्यंत चुकीचे व शहरातील नागरीकांची फसवणूक करणारे असल्याने हा प्रस्ताव नामंजूर करावा असे बावचकर यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area