मुंबई शहरात मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन-जिल्हाधिकारी राजीव निवतकर

 


मुंबई दि. 25 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी दिली आहे.

 

दिनांक १७ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२० या दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीमध्ये विशेष मोहिमांचे आयोजन करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार मोहिमेदरम्यान मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघ स्तरावर दिनांक ५, ६, १२ व १३ डिसेंबर रोजी शनिवार व रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी विशेष मतदार नोंदणी करण्यात येणार आहे.

 

या विशेष मोहिमेअंतर्गत मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या, कृष्ण धवल छायाचित्र असलेल्या मतदारांचे रंगीत छायाचित्र घेण्यात येतील.

 

सर्व नागरिकांनी कुटुंबातील मयत झालेल्या व्यक्ती, दुबार नावे असलेले मतदार व स्थलांतरित झालेल्या मतदारांनी विशेष मोहिमेच्यावेळी फॉर्म क्रमांक ७ भरुन देऊन मतदार यादीतील नावांची वगळणी करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करुन http://www.nvsp.in या ठिकाणी देखील मतदार आपली ऑनलाईन नोंदणी करू शकतात, असे जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत कळविण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area