इचलकरंजी /प्रतिनिधी –
सातत्याने कामगार विरोधी धोरण घेणार्या मोदी सरकारच्या विरोधात सर्वच कामगारांनी एकत्र येऊन लढा उभारत कामगार विरोधी बिलास विरोध करण्यासाठी गुरुवार 26 नोहेंबर रोजीच्या देशव्यापी संपात मोठ्या संख्येने सामील व्हावे, असे अवाहन कामगार नेते कॉ. दत्ता माने यांनी कामगार मेळाव्यात बोलताना केलेकामगार शेतकरी विरोधात कायदे करणार्या मोदी सरकारच्या विरोधात 26 नोव्हेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामध्ये इचलकरंजीसह हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील कामगार सहभागी होणार आहेत. या संपाच्या तयारीसाठी येथील थोरात चौक मार्केट शेडमध्ये कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने सर्वच धंद्यातील संघटीत व असंघटीत क्षेत्रातील कामगारांचा विराट मेळावा पार पडला.
कॉ. माने म्हणाले, मोदी सरकारने 29 केंद्रीय कामगार कायदे रद्द करुन 4 श्रम संहीता संसदेत मंजुर करुन घेतल्या. त्यामुळे कामगारांचे लढून मिळवलेले कामगार कायदे एका दमात मोदी सरकार नष्ट करत आहे. त्याला विरोधासाठी देशभरातील सर्व कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. यंत्रमाग कामगार कल्याण मंडळाची नुसती घोषणा होत आहे, यंत्रमाग कामगारांसह सर्व असंघटीत कामगारांचे किमान वेतन 21 हजार करा, कामगारांना नोकरीची शाश्वती द्या या व इतर मागण्यासाठी पुकारलेल्या संपात सहभागी होण्यासाठी सर्वांनी सकाळी 11 वाजता कॉ. के. एल. मलाबादे चौक येथून निघणार्या मोर्चात सहभागी व्हावे असे सांगितले.
यावेळी शामराव कुलकर्णी, भरमा कांबळे, आनंदा गुरव, मदन मुरगुडे, राहूल दवडते, रियाज जमादार, धोंडीबा कुंभार, हणमंत लोहार, शिवानंद पाटील, हणमंत मत्तुर, सुभाष कांबळे आदींसह कामगार उपस्थित होते.