सार्वजनिक-खाजगी-भागीदारी तत्वामुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात होणार आमूलाग्र बदल – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

 


मुंबई, दि. 25 : सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वामुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला.

 

वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत सार्वजनिक‍ खाजगी भागीदारी तत्वाच्या (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप) संभाव्य धोरणासंदर्भात मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह डॉ. गुस्ताद डावर, डॉ. अजय भांडारवार, डॉ. संजय बिजवे, श्री. पागे उपस्थित होते. तर ऑनलाईन मिटींगद्वारे टाटा हॉस्पीटलचे डॉ. राजन बडवे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. भावेश मोदी, डॉ.चंद्रशेखर उपस्थित होते.

 

श्री. देशमुख म्हणाले की, सध्या कोविड-19 या विषाणूमुळे जगातील, देशातील आणि महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. असे असले तरी यापुढील काळात सामान्य माणसालाही उत्तम रुग्णसेवा मिळणे गरजेचे आहे. याला प्राधान्य देण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वानुसार वैद्यकीय महाविद्यालये चालविता येतील का याबाबतची शक्यता तपासून घेणे आवश्यक असल्याने याविषयावर सखोल चर्चा करण्यासाठीच आजची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

 

महाराष्ट्रातील रुग्णसंख्या पाहता डॉक्टरांची संख्या वाढणे जितके आवश्यक आहे, त्याचप्रमाणे रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा देणेही आवश्यक आहे. महाराष्ट्रातील एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निवडून येथे सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वातून महाविद्यालय कसे चालते हे पाहण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यापूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत गठीत करण्यात आलेल्या समितीने सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर पूर्णपणे चालविण्यात येणारे टाटा हॉस्पीटल आणि गुजरात येथील हॉस्पीटलबाबत पूर्ण पाहणी करुन याबाबतचा अहवाल द्यावा, असेही श्री. देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

डॉ. संजय बिजवे यांनी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वाद्वारे येणाऱ्या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये कशी सुरु करता येतील याबाबत सादरीकरण केले. तर उपस्थित मान्यवर सदस्यांनी याबाबत आपापली मते मांडली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area