दमदाटी, धक्काबुक्की करत कामगारांकडील मोबाईल, रोख हिसकावून घेऊन लुटमार करणारे दोघे चोरटे गजाआड

 


इचलकरंजी/प्रतिनिधी -

दमदाटी, धक्काबुक्की करत कामगारांकडील मोबाईल, रोख हिसकावून घेऊन लुटमार करणार्‍या  दोघा चोरट्यांना गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या कारवाईत गजानन रामचंद्र पटवेगार (वय 21) व मुदकाप्पा येलगुरप्पा मुलीमणी (वय 23 दोघे रा. बरगे मळा जुना चंदूर रोड) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मोबाईल व मोटरसायकल असा 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, 31 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तीनबत्ती चौक ते चंदूर रोड या रस्त्यावरील मगदूम मळा परिसरात तात्यासाहेब अशोक पाटील (रा. चंदूर ता. हातकणंगले) हे कामावर जात होते. त्यावेळी पाठीमागूून मोटरसायकलीवरुन आलेल्या दोघांनी पाटील यांना रस्त्यात अडवून धक्काबुक्की करत त्यांच्याकडील मोबाईल व खिशातील 600 रुपयांची रोकड असा 5600 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. विविध गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास सुरु असताना स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक विकास जाधव यांना इचलकरंजी-चंदूर रस्त्यावरील काळ्या ओढ्यावर दोन इसम मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याठिकाणी सापळा रचला. त्यावेळी पुलावर दोन व्यक्ती काळ्या रंगाच्या बजाज बॉक्सर दुचाकीसह थांबले असल्याचे दिसून आले. त्यांना संशयावरुन ताब्यात घेऊन चौकशी करता त्यांच्याकडे चोरीचा मोबाईल मिळून आला. त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करुन मोबाईल व दुचाकी असा 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि विकास जाधव, संजय इंगवले, प्रशांत कांबळे, रणजित पाटील, अमर शिरढोणे, फिरोज बेग, आयुब गडकरी, महेश खोत, राजू कांबळे, यशवंत कुंभार आणि सायबर विभागाकडील सचिन बेंडखळे आदींच्या पथकाने केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area