धान खरेदीसाठी उत्पादनाच्या प्रमाणात खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचे आदेश

 


मुंबई, दि. 25 : गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील धान खरेदीबाबत चर्चा करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेण्यात आली. धान उत्पादक शेतकऱ्यांना धान विक्रीत अडचण येऊ नये तसेच शेतकऱ्यांची धान खरेदी थांबता कामा नये यासाठी जास्तीत जास्त खरेदी केंद्र चालू करण्याचे आदेश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाला दिले आहेत.

 

शेतकऱ्यांचे धान उत्पादन आणि धान विक्रीच्या प्रमाणात खरेदी केंद्र वाढवा त्यासाठी जास्तीत जास्त नवीन खरेदी केंद्र सुरू झाली पाहिजेत आणि शेतकऱ्यांचे सर्व धान खरेदी केले पाहिजे असे निर्देश छगन भुजबळ यांनी दिले. धान खरेदी करण्याच्या कामात मदत व्हावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती ची मदत घेऊन धान खरेदीचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी सूचना खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केली. त्यानुसार ज्या ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून धान खरेदीसाठी मागणी करण्यात येईल त्यांना धान खरेदीची परवानगी देण्यात यावी तसेच धान खरेदीच्या कामामध्ये एपीएमसी ही नोडल एजन्सी म्हणून काम पाहिल आणि धान खरेदी करणाऱ्या दोन्ही एजन्सीला मदत करेल, असे निर्देश श्री.भुजबळ यांनी दिले.

 

शेतकऱ्यांचे संपूर्ण धान कोणत्याही परिस्थितीत खरेदी झाले पाहिजे. फक्त भंडारा गोंदिया नाही तर ज्या ज्या ठिकाणी अडचणी असतील त्या सोडवा ,असे आदेश श्री. भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिले. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी धानाचे उत्पादन जास्त आहे, त्यामुळे नवीन खरेदी केंद्र राज्यात ज्या ज्या ठिकाणी गरज आहे अशा प्रत्येक ठिकाणी सुरू करा असे आदेशदेखील श्री. भुजबळ यांनी प्रशासनाला दिले.

 

या बैठकीला, गृहमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख, खासदार प्रफुल्ल पटेल, आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ.मनोहर चंद्रिकापुरे, आमदार राजू कारेमोरे,  अन्न, नागरी पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील, मार्केटिंग फेडरेशनचे महाव्यवस्थापक डॉ.अतुल नेरकर, व्यवस्थापकीय संचालक एस. बी. तेलंग, आदिवासी विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक श्री. राठोड, अन्न नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव मनोजकुमार सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area