शिरोळ येथील समतानगर परिसरात सुरु असलेल्या गोवा बनावटीच्या मद्य विक्री केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क इचलकरंजी विभागाने टाकला छापा टाकला; 1 लाख 8 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त
December 02, 2020
0
इचलकरंजी/प्रतिनिधी -
शिरोळ येथील समतानगर परिसरात सुरु असलेल्या गोवा बनावटीच्या मद्य विक्री केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क इचलकरंजी विभागाने छापा टाकला. या प्रकरणी पाचजणांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये एका पोलिस कॉन्स्टेबलचा समावेश आहे. कारवाईत 1 लाख 8 हजार 480 रुपये किंमतीच्या विविध कंपन्यांच्या मद्याचे 16 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत.
दरम्यान, यातील यमनाप्पा वडर हा पोलिस कॉन्स्टेबल असून तो सध्या मिरज येथे कार्यरत आहे. तोच मुख्य सूत्रधार असून गोवा बनावटीची दारु आणण्याचे व विक्रीचे काम करीत होता. त्याच्याच घरावर ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, शिरोळ येथील समतानगर परिसरात गोवा बनावटीच्या मद्याची विक्री करणारे केंद्र असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क इचलकरंजी विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता तेथे इम्पेरियल ब्लु व्हिस्कीच्या 672, मॅक्डोवेल नं. 1 व्हिस्कीच्या 96 बाटल्या मिळून दोन बॉक्स मद्याच्या बाटल्या असा 1 लाख 8 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर यमनाप्पा आण्णासो वडर (वय 33), युवराज नागाप्पा वडर (वय 21 दोघे रा. समतानगर शिरोळ), ऋषिकेश कृष्णा पाटील (वय 21 रा. शिरोळ), विक्रम बाळासो गवळी (वय 33 रा. शिरटी) व तानाजी मोहन थारवत (वय 34 रा. घालवाड) यांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई इचलकरंजी विभागाचे निरिक्षक पी. आर. पाटील, दुय्यम निरिक्षक वर्षा पाटील, राहुल गुरव, सहाय्यक दुय्यम निरिक्षक जी. एच. हजारे, जवान सुभाष कोले, विलास पवार, प्रसन्नजीत कांबळे आदींच्या पथकाने केली.