इचलकरंजी/प्रतिनिधी -
बंद घरे लक्ष्य करुन त्याठिकाणी घरफोडी करणार्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. शलमोन सुरेश कांबळे (वय 20) व चाँद हुसेन शेख (वय 23 दोघे रा. महात्मा गांधी कुष्ठरोग वसाहत) अशी अटक केलेल्यांची नांवे आहेत. त्यांच्याकडून तीन घरफोड्या उघडकीस आल्या असून 1 लाख 84 हजार 144 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि विकास जाधव यांनी दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, मागील काही आठवड्यात शहरात घरफोडीचे प्रमाण वाढल्याने त्या अनुषंगाने तपास सुरु होता. त्यातच घरफोडी प्रकरणातील आरोपी बिग बझार परिसरात चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला मिळाली. माहिती खातरजमा करुन सीईटीपी ते बिगबझार या रिंगरोडवरील बालाजी मंदिर परिसरात सापळा रचण्यात आला. त्यावेळी संशयावरुन तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी शहरातील मुक्त सैनिक वसाहत व कुष्ठरोग वसाहतीतील चोरीची कबुली दिली. कुष्ठरोग वसाहतीतील एका घरातून त्यांनी मोबाईल चोरला होता. तर मुक्त सैनिक वसाहतीत एक बंद घर फोडले आणि किराणा दुकानावरील सिमेंटचे पत्रे फोडून दुकानातील रोकड लांबविली होती.
या तिघांमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून तिघेही पोलिस रेकॉर्डवरील गुुन्हेगार आहेत. शलमोन कांबळे याच्यावर चोरी व खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे सपोनि जाधव यांनी सांगितले.
ही कारवाई सपोनि विकास जाधव, बालाजी पाटील, आयुब गडकरी, सुरज चव्हाण, खंडेराव कोळी, संभाजी भोसले, राजू शिंदे, प्रशांत कांबळे, संजय इंगवले, फिरोज बेग, शहनाज कनवाडे, चालक यशवंत कुंभार यांच्या पथकाने केली.
घरफोडी करणार्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले; 1 लाख 84 हजार 144 रुपयांचा मुद्देमाल जप्त
December 08, 2020
0
Tags