इचलकरंजी/प्रतिनिधी -
दुचाकीवरुन बेकायदेशीररित्या मद्याची वाहतूक करताना गावभाग पोलिसांनी एकाला अटक केली. पंकज रमेशलाल गोदवाणी (वय 27 रा. नारायणी हाईटस बिगबझारचे मागे) असे त्याचे नांव असून त्याच्याकडून मोटरसायकलसह विविध कंपन्यांच्या मद्याच्या बाटल्या मिळून 35 हजार 570 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. असे असताना सांगली रोडवर दुचाकीवरुन मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सांगली रोडवरील बिगबझार ते जुना सांगली नाका या मार्गावर हॉटेल गार्डनसमोर पंकज गोदवाणी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडी अॅक्टिव्हा मोपेड (क्र. एमएच 09 इपी 7916) ची झडती घेतली असता त्यामध्ये मद्याच्या बाटल्या मिळून आल्या. पोलिसांनी मॅकडॉल नं. 1 व्हिस्कीच्या 23, डॉक्टर ब्रँडीच्या 15, इम्पेरियल ब्लूच्या 4 आणि अॅक्टिव्हा असा 35 हजार 570 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गोदवाणी याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(अ)(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.