इचलकरंजी/प्रतिनिधी -
सीआयडी पोलिस असल्याची बतावणी करत वृध्दाकडील 5 लाख 60 हजार रुपये किंमतीचे 14 तोळ्यांचे सोन्याचे दागिने दोघांनी हातोहात लंपास केले. छत्रपती संभाजी चौक परिसरातील किरण गॅसनजीक ही घटना घडली. या प्रकरणी राजाराम रामेश्वरलाल माहेश्वरी (वय 68 रा. लक्ष्मी प्रोसेसर्सजवळ) यांनी शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली आहे.
या प्रकरणी घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, राजाराम माहेश्वरी हे बुधवारी दुपारच्या सुमारास जुना चंदूर रोड परिसरातील लक्ष्मी व्यंकटेशनगर येथे आपल्या बहिणीकडे दुचाकीवरुन निघाले होते. ते संभाजी चौकातून निघाले असता किरण गॅस नजीक पाठीमागून मोटरसायकलवरुन आलेल्या एका व्यक्तींनी त्यांना थांबविले. सीआयडी अधिकारी असल्याचे आयकार्ड दाखवत त्याने रमेशवर चाकूहल्ला झाला असून वातावरण खराब असल्याचे सांगत तो माहेश्वरी यांच्या दुचाकीची डिक्की तपासू लागला. त्याचवेळी काळ्या रंगाची बॅग घेतलेली व्यक्ती तेथून जात असताना त्याने त्या व्यक्तीला थांबवून त्यालाही आयकार्ड दाखवत त्याच्याकडील अंगठी बॅगेत ठेवण्यास सांगितले. त्यानुसार त्या व्यक्तीने अंगठी काढून बॅगेत ठेवली. त्यानंतर त्या व्यक्तीने माहेश्वरी यांना सर्व दागिने काढून मोपेडच्या डिक्कीत ठेवण्यास सांगितले. त्यानुसार माहेश्वरी यांनी सोन्याची चेन, ब्रेसलेट व अंगठी काढून डिक्कीतील पिशवीत ठेवली. त्यावेळी त्या व्यक्तीने डिक्कीतून दागिने ठेवलेली पिशवी काढत ते मोजले व पिशवी डिक्कीत ठेवली. या प्रकारानंतर माहेश्वरी हे आवाडेनगर येथील हनुमान मंदिराजवळ आले असताना त्यांनी डिक्की उघडून पाहिली असता पिशवीत दागिने नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे माहेश्वरी यांच्या लक्षात आले. माहेश्वरी यांचेकडील 80 ग्रॅम वजनाचे 3 लाख 20 हजाराचे ब्रेसलेट, 50 ग्रॅमची सोन्याची 2 लाखाची चेन व 10 ग्रॅमची 40 हजार रुपयांची अंगठी असे 5 लाख 60 हजार रुपयांचे 14 तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी हातोहात लांबविले.
माहेश्वरी यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन पाहणी केली. तसेच परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली असता दोघे चोरटे सीसीटिव्हीत कैद झाले आहेत. मोटरसायकलवरुन दोघेजण संभाजी चौकाच्या दिशेने निघून गेल्याचे दिसत आहेत. त्यावरुन पोलिस या दोघांचा शोध घेत आहेत.