महिन्याभरापूर्वी झालेल्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने लावला छडा ;एकास अटक,5 लाख 76 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त

 


इचलकरंजी/प्रतिनिधी -

महिन्याभरापूर्वी शिरोळ तालुक्यातील संभाजीपूर येथे झालेल्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने छडा लावला आहे. या घरफोडी प्रकरणी लोकेश रावसाहेब सुतार (वय 26 रा. लिंगनूर ता. मिरज) याला अटक केली असून त्याच्याकडून 93 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक मोटरसायकल, एक मोबाईल असा 5 लाख 76 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि विकास जाधव यांनी दिली.
शहर व परिसरातील घरफोडी, चेन स्नॅचिंग अशा विविध गुन्ह्यांच्या तपासाबाबत आलेल्या सुचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून तपास सुरु होता. याच दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि विकास जाधव यांना गोपनीय सूत्राकडून चोरट्यासंदर्भात माहिती मिळाली. त्यानुसार जयसिंगपूर-कोल्हापूर मार्गावरील निमशिरगांव गावच्या हद्दीत सापळा रचण्यात आला होता. मिळालेल्या माहितीवरुन आणि संशयावरुन पथकाने एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने महिन्याभरापूर्वी संभाजीपूर शिरोळ येथे बंद घर फोडून दागिने लांबविल्याची कबुली दिली. त्याची झडती घेता त्याच्याकडे सोन्याचे दागिने, गंठण, चेन, अंगठ्या असे 93 ग्रॅम वजनाचे दागिने मिळून आले. तर गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व मोबाईल जप्त करण्यात आला.
लोकेश सुतार हा सराईत चोरटा असून त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याने सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, इस्लामपूर, आष्टा, विटा, तासगांव तसेच कर्नाटकातील अथणी, बिळगी, जमखंडी तसेच सातारा, नवीमुंबई आदी ठिकाणी घरफोड्या केला आहे. तो पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर 27 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि विकास जाधव, संभाजी भोसले, राजीव शिंदे, महेश खोत, रणजित पाटील, संजय इंगवले, प्रशांत कांबळे, अमर शिरढोणे, सुरज चव्हाण, शहनाज कनवाडे, राजू कांबळे, यशवंत कुंभार तसेच सायबर विभागाचे सचिन बेंडखळे, सुरेश राठोड आदींच्या पथकाने केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area