इचलकरंजी/प्रतिनिधी -
सूताच्या दरात सातत्याने केल्या जात असलेल्या दरवाढीच्या विरोधात शनिवारी यंत्रमागधारक संघटना कृती समितीच्यावतीने शिवाजी उद्यानातील सूत मार्केट आणि कॉ. मलाबादे चौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी सूत व्यापार्यांनी नफेखोरी न थांबवल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
सूत दरात दैनंदिन होत चाललेल्या दरवाढीमुळे यंत्रमागधारक अडचणीत येत आहेत. सूत व्यापार्यांच्या या नफेखोरीच्या विरोधात शहरातील सर्व यंत्रमागधारक संघटना एकजूट झाल्या आहेत. या यंत्रमागधारक संघटना कृती समितीच्यावतीने सूत मार्केट आणि कॉ. मलाबादे चौकात अन्यायी सूत दरवाढीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी सतीश कोष्टी, राजगोंडा पाटील यांनी, सूत व्यापार्यांकडून नैतिकता पाळली जात नसल्याने कारखानदारांना नुुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे सूत व्यापार्यांनी ही पध्दत न बदलल्यास कारखानदारांनाही वेगळा विचार करावे लागेल, असा इशारा दिला. विनय महाजन, प्रकाश मोरे यांनी, सूताच्या काऊंट आणि वजन यामध्येही तफावत असते. खरेदी केलेल्या सूताचे बिल न देता वेगळ्या काऊंटच्या सुताचे बिल दिले जाते. एकूणच चुकीच्या पद्धतीने व्यापार करून सूत व्यापारी कारखानदारांची पिळवणूक करत असल्याचा आरोप केला. तसेच आंदोलनाच पूर्वसूचना देऊनही सूत व्यापारी प्रतिनिधी उपस्थित नसल्याने त्यांचा निषेध नोंदविण्यात आला. पुंडलिक जाधव, सागर चाळके यांनी, उद्योगाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असल्यामुळे जागरूकतेने या विरोधात आंदोलन उभारण्याची गरज व्यक्त करत सूत व्यापार्यांनी आंदोलनाची दखल घेऊन यंत्रमागधारक संघटनांना चर्चेसाठी वेळ द्यावा अन्यथा आमदार, खासदारांची भेट घेऊन प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे सूत दरवाढ प्रश्नी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्याचबरोबर या विरोधात आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशाराही दिला.
आंदोलनात दत्तात्रय कनोजे, चंद्रकांत पाटील, पांडुरंग धोंडपुडे, बाळासाहेब कलागते, प्रकाश गौड, राजाराम धारवट, बंडोपंत लाड, अमित गाताडे, विकास चौगुले यांच्यासह कारखानदार सहभागी झाले होते.
सूताच्या दरवाढीच्या विरोधात शनिवारी सूत मार्केट आणि कॉ. मलाबादे चौक येथे जोरदार निदर्शन
December 05, 2020
0
Tags