लोहार यांच्यावर तीव्र आंदोलन करण्यात येईल, प्रा. सुकुमार कांबळेयांचा इशारा

 इचलकरंजी/प्रतिनिधी -

आपल्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध व्यवसायांवर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकल्याने संतप्त झालेल्या सहाय्यक पोलिस निरिक्षक गजेंद्र लोहार यांनी मानवी हक्कांची पायमल्ली करत पकडलेल्या संशयित आरोपींचे मुंडण केले. त्यांचे हे कृत्य  मानवतेला काळीमा फासणारे असून त्यांना तातडीने बडतर्फ करावे. 6 डिसेंबरपर्यंत लोहार यांच्यावर कारवाई न झाल्यास विशेष पोलिस महानिरिक्षकांच्या कार्यालयासमोर डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पार्टीचे संस्थापक प्रा. सुकुमार कांबळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
ते म्हणाले, आम्ही कधीही अवैध व्यावसायिक अथवा गुन्हेगारांचे समर्थन करणार नाही. परंतु जुगार क्लबवर सापडलेल्या चौदाजणांना लोहार यांच्याकडून जी वागणूक देण्यात आली ते अत्यंत चुकीचे आहे. उठाबशा काढण्यास लावणे, गुडघे व खोपरावर रांगण्यास लावणे आणि धर्मालाही लाजवेल असे कृत्य करत सर्वांचे मुंडण करणे यातून लोहार यांनी मानवी मूल्यांची प्रतारणा केली आहे. आरोपीला ताब्यात घेणे व त्याला शिक्षा व्हावी यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची जुळवाजुळव करणे ही पोलिसांची कामे आहेत. शिक्षा देण्याचे काम हे न्यायालयाचे असताना लोहार यांनी मनमानी करत आणि आपल्या हद्दीत अन्य खात्याने केलेल्या कारवाईमुळे ते पिसाळले आहेत. त्यातूनच त्यांनी सर्व संशयितांना जातीवाचक शिवीगाळ केली. न्यायालयासमोर आपल्या कृत्याचे पितळ उघडे पडू नये यासाठी संशयित आरोपींना कोरोनाचा आधार घेत कानटोपी व मास्क घालण्यास भाग पाडले. तर लोहार यांच्या कृत्यामुळे नैराश्यातून संशयितांपैकीच अमर मगदूम याने न्यायालयाच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न केला.
सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र भोरे याच्या आत्मदहनाला काही अंशी लोहार हेही जबाबदार असल्याचे स्पष्ट होते. लोहार यांचा दंडुकेशाहीचा वापर आणि हेकेखोर वृत्तीमुळे शहराच्या नावलौकिकाला गालबोट लागले आहे. म्हणूनच मानवी हक्क पायदळी तुडविणार्‍या लोहार यांना सेवेतून बडतर्फ करावे, असे प्रा. कांबळे यांनी सांगितले.
संशयितापैकी तानाजी आवळे यांनीही लोहार यांनी दिलेल्या वर्तणूकीचे कथन करताना लोहार यांच्या विरोधात सर्वजण मानवी हक्क आयोगाकडे या संदर्भात रितसर तक्रार देण्यात असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेत राज्य सरचिटणीस संदीप ठोंबरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शितल खरात, सतिश भंडारे, प्रमोद बिरांजे, शिवाजी माने, प्रसाद रेडेकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area