गुणवत्ता टिकवण्यासाठी सराव हवाच -प्रशांत सातपुते
कोल्हापूर, दि. 3 : सराव आपल्याला परिपूर्ण बनवतो. सराव म्हणजे गुणवत्ता टिकण्याचे सार त्यामुळे गुणवत्ता टिकवण्यासाठी सराव हा हवाच, असे मार्गदर्शन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्यावतीने अनुदानित वसतिगृह अधीक्षकांची दोन दिवशीय कार्यशाळा चंदगड तालुक्यातील हेरे येथील महात्मा फुले विद्यार्थी वसतिगृहात घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, समाज कल्याण निरीक्षक सदानंद बगाडे, सुभाष पवार, छत्रपती शाहू महाराज वसतिगृह संघटनेचे अध्यक्ष राजाराम कांबळे, बाबासाहेब आब्रे, साताप्पा कांबळे उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले.
ज्या व्यवसायात किंवा क्षेत्रात आहात त्यातील आपले कौशल्य धारदार करीत रहा, असे सांगून श्री. सातपुते म्हणाले, आपल्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करून स्वत:ला अजुन कस चांगलं करता येईल याकडे लक्ष द्या. आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा अभ्यास करा आणि आपले ज्ञान वाढवत रहा.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. घाटे म्हणाले, कोरोना नंतर वसतिगृह कशा पध्दतीने सुरू करायची, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कसे करायचे हा हेतू ठेवून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तुम्ही सर्वजण उत्तम काम करत आहात. वसतिगृहांसाठी लागणाऱ्या सुविधा, साधनसामुग्री निश्चितपणे पुरवण्यात येईल. या दोन दिवसांच्या कार्यशाळेत एकमेकांशी संवाद साधून, विचारविनिमय करून नवीन कौशल्य आत्मसात करावीत. येथून जाताना नव्या संकल्पना, नवा विचार, नवा उत्साह आणि नवी उर्जा घेवून जावी, उदात्त आणि सकारात्म हेतू ठेवून आपल्या क्षेत्रात काम करावे. आपल्या समस्या सोडवण्यासाठी जरूर प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
स्वागत विलास कांबळे, प्रास्ताविक जी.एस. देसाई यांनी तसेच सूत्रसंचालन नवनीत पाटील यांनी केले. वंदना कांबळे, विद्या लंबे आदींसह जिल्ह्यातील अनुदानित वसतिगृहांचे अधीक्षक, स्वयंपाकी, पहारेकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area