अनैतिक संबंधातून आसरानगर परिसरात एका युवकावर खूनी हल्ला

 


इचलकरंजी/प्रतिनिधी -

अनैतिक संबंधातून आसरानगर परिसरात एका युवकावर खूनी हल्ला करण्यात आला. नागेश सुरेश यमुल (वय 35, रा. लाखेनगर-जाधव मळा) असे त्याचे नांव आहे. आसरानगर गल्ली नं.6 मध्ये मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी गावभाग पोलिसांनी राहुल विनोद पाथरवट (रा. साईट नं. 102), नागेश शिवाप्पा हिरीकुरभूर (रा. पाटील मळा) व सुप्रिया पांडु वाघमोरे (रा. आसरानगर गल्ली नं. 6) या तिघांना कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती माहिती प्रभारी निरिक्षक गजेंद्र लोहार यांनी दिली. घटनेनंतर हल्लेखोरांनी जखमी नागेश याला घरात कोंडून घालून पलायन केले. या घटनेमुळे आसरानगर भागात खळबळ माजली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, लाखेनगर परिसरातील नागेश यमुल याचे आसरानगर येथे राहणार्‍या सुप्रिया वाघमोरे यांच्यात गत सहा वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. त्यातूनच यमुल याचे वाघमोरे हिच्या घरी येणे-जाणे होते. मंगळवारी रात्री यमुल हा वाघमोरे हिच्या घरात गेला होता. घरातून तो बाहेर पडताना त्याच्या ओळखीचा राहुल पाथवरट व त्याचा मित्र नागेश हिरीकुरभूर भेटले. त्या दोघांनी कोयत्याने यमुल याच्यावर हल्ला केला. त्यावेळी त्यांच्यात झटापटही झाली. या खूनी हल्ल्यात यमुल याच्या डोक्यावर, हातावर, चेहर्‍यावर वर्मी घाव बसल्याने तो गंभीर जखमी झाला. भरवस्तीत घडलेल्या या घटनेने परिसरात घबराहट निर्माण झाली होती. त्यातच हल्लेखोर राहुल, नागेश व सुप्रिया या तिघांनी जखमी यमुल याला घरात कोंडून घालून पलायन केले. सुमारे तासभर यमुल हा जखमी अवस्थेत खोलीतच पडला होता. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने घरातच रक्ताचे थारोळे साचले होते. या प्रकरणाची माहिती भागातील नागरीकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर गावभाग पोलिस घटनास्थळी आले व त्यांनी जखमी यमुल याला उपचारासाठी दाखल केले. अनैतिक संबंधाच्या कारणातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील संशयित राहुल पाथरवट, सुप्रिया  वाघमोरे व नागेश हिरीकुरभूर या तिघांचा शोध काढत त्यांना कर्नाटकातून अटक केली आहे. घटनास्थळी पोलीस उपअधिक्षक बाबुराव महामुनी, जयसिंगपूरचे पोलीस उपाधिक्षक रामेश्‍वर वैजंणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत सूचना केल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area