शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापत्य स्वरुपाच्या कामासाठी ५० लाख रुपयांची प्राथमिक तरतूद – पालकमंत्री उदय सामंत

 


सिंधुदुर्ग  दि. 20 : जिल्हा वासियांचे स्वप्न असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सुरुवातीच्या तात्पुरत्या स्वरुपात लागणाऱ्या दुरुस्त्या करण्यासाठी 50 लाख रुपयांची प्राथमिक तरतूद करण्यात आली असून आणखी 40 लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोरोना सद्यस्थिती, कोविड-19 लसीकरण याविषयी बैठक संपन्न झाली. त्यावेळी श्री.सामंत बोलत होते.

 

या बैठकीस आमदार वैभव नाईक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस.मोरे, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलिपे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे आदी उपस्थित होते.

 

शासकीय महाविद्यालयासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना देऊन पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी एनएचएम अंतर्गत फर्निचर खरेदी, 130 बेड्स लागणार आहेत त्याचा प्रस्ताव, पुस्तके यांचा प्रस्ताव सादर करावा. त्यासाठी जिथे जिल्हाधिकारी यांची मान्यता लागते तिथे ती घ्यावी आणि येत्या दोन दिवसात हे सर्व प्रस्ताव पाठवावेत. कोल्हापूरच्या वैद्यकीय महाविद्यालाने सहकार्य देण्याची भूमिका घेतली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी याविषयी समन्वय ठेवावा. अधिष्ठाता आणि शल्य चिकित्सक यांनी नियमित सुरू असलेल्या कामाचा आढावा घ्यावा आणि आठवड्यातून एकदा याविषयी माहिती द्यावी. लॅबसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीचा प्रस्तावही तातडीने पाठवावा, अशा सूचना पालकमंत्री श्री.चव्हाण यांनी दिल्या.

 

पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी जिल्ह्यातील लसीकरणाच्या तयारीचाही आढावा घेतला. यावेळी जिल्ह्यात किमान अडीच लाख लसींच्या साठवणुकीची क्षमता आहे. तर 4 लाख लसी साठवणुकीची क्षमता तात्काळ निर्माण करता येईल, सध्या जिल्ह्यामध्ये 80 डिपफ्रीजर असून 60 कार्यान्वित आहेत, आयएसआर हे महत्त्वाचे युनिट्स 74 असून 62 कार्यान्वित असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलिपे यांनी दिली. तसेच जिल्ह्यामध्ये टप्प्या टप्प्याने होणाऱ्या लसिकरणाचा सविस्तर आढावा पालकमंत्री श्री.सामंत यांनी यावेळी घेतला. तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कामे तातडीने सुरू करावीत, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या कामांचा आढावा घ्यावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

00000

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area