पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेसतर्फे प्रांताधिकारी कार्यालयावर मोटरसायकली ढकलत मोर्चा



 इचलकरंजी/प्रतिनिधी -

सातत्याने होत असलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात सोमवारी राष्ट्रीय काँग्रेसतर्फे प्रांताधिकारी कार्यालयावर मोटरसायकली ढकलत मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रांत कार्यालयासमोर दरवाढीच्या विरोधात मोदी सरकारवर हल्लाबोल चढवत निदर्शने करण्यात आली.
केंद्रातील मोदी सरकारने 1 डिसेंबरपासून पेट्रोल ,डिझेलच्या दरामध्ये 2 रुपये आणि गँस सिलिंडरमध्ये 100 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आधीच कोरोना महामारी व लाँकडाऊनमुळे उद्योग व्यवसाय बंद पडून रोजगार नसल्याने अनेकांना आर्थिक अडचणींचा मोठा सामना करावा लागत आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे मोर्चा काढण्यात आला. कॉ. मलाबादे चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी आंदोलनासाठी दोन म्हैशी आणण्यात आल्या होत्या. त्याला परवानगी नसल्याने पोलिसांनी त्याला मज्जाव केला.
प्रांत कार्यालयावर याठिकाणी मोर्चा आल्यानंतर कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी इंधन दरवाढ संदर्भातील विविध फलक लक्षवेधी ठरले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे दर घसरले असताना देखील केंद्र सरकारने भारतात मात्र या दरामध्ये वाढ करुन सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट करत असल्याचा आरोप करण्यात आला. मनमोहन सिंगांच्या काळात काँग्रेसने इंधन दरवाढीवर नियंत्रण ठेवले होते. परंतु मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून भांडवलदारांचे खिसे भरून सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारायला सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारचे सर्व कायदे जनतेविरोधी असून सर्वसामान्यांचे शोषण होत आहे. इंधनाचे दर वाढल्याने देशांतर्गत संपूर्ण अर्स्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या सर्व बाबींचा विचार करून पेट्रोल व डिझेलवरील अबकारी दर कमी करावेत व घरगुती गॅसचे दर कमी करून दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राहुल खंजिरे यांनी दिला. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे, शशांक बावचकर यांनीही संतप्त भावना व्यक्त केल्या. मागणीचे निवेदन शिरस्तेदार उदयसिंह गायकवाड यांनी स्वीकारले.
या मोर्चामध्ये बाबासो कोतवाल, शशिकांत देसाई, अजित मिणेकर, राजन मुठाणे, हारुण खलिफा, प्रशांत लोले, शेखर पाटील, संग्राम घुले, बंडू नेजे, राजू आवळे, योगेश पंजवाणी, दिलीप पाटील, रवी वासुदेव, आनंदा घोरपडे, आनंदा पवार, अशोक पवार, दीपक पाटील, संतोष भिसे, मारुती कोरवी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area