महसूल यंत्रणा बळकटीकरणासाठी प्रयत्न – महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार

 


मुंबई, दि.६ : मुंबई जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र आणि लोकसंख्येची घनता पाहता त्या प्रमाणात महसूल विभागाची यंत्रणा कमी आहे. तरीही महसूल वसुलीचे प्रमाण समाधानकारक आहे. महसूल यंत्रणा बळकट करण्याचे आश्वासन महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच घेतलेल्या प्रशासनिक आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी उपस्थित होते.

वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ च्या करण्यासाठी चर्चा


मुंबई शहरातील वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये करण्यासाठी बैठकीत सविस्तर चर्चा  झाली. शासनाच्या या धोरणामुळे महसुलात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. या कामासाठी महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या पूर्ण क्षमतेने भरण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. मुंबई जिल्ह्यात एक उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि दोन तहसील कार्यालयाची लवकरच स्थापना करण्याच्या प्रस्तावाला गती देण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यामुळे मुंबई जिल्ह्यातील नागरिकांचा त्रास कमी होण्यास मदत होणार असल्याचे राज्यमंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले. तसेच मुंबई शहरात प्रभाग आणि वॉर्ड पातळीवर तलाठ्यांची गरज आहे. त्यामुळे लवकरच तलाठी भरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासनस्तरावर गती देण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली.

बाबा हाजीअली दर्ग्याचे नूतनीकरण व सौंदर्यीकरण होणार


मुंबईतील श्रद्द्धास्थान असलेल्या बाबा हाजीअली दर्ग्याचे लवकरच नूतनीकरण आणि सौंदर्यीकरण्यात येणार आहे. याकरिता जिल्हा नियोजन समितीमधून निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच सर्वधर्माच्या भाविकांना सोयी, सुविधा पुरविण्यासाठी शासनाच्या विशेष निधी देण्यात आला आहे. त्यामुळे बाबा हाजीअली दर्ग्याचे लवकरच नूतनीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली.

ईव्हीएमसाठी गोडाऊनची निर्मिती….


निवडणुकीनंतर ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी मुंबई शहरात लवकरच गोडाऊनची निर्मितीसाठी भारत निवडणूक आयोगाकडे निधीची  मागणी करण्यात येणार आहे. या गोडाऊनसाठी मुंबई शहरात जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
०००

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area