‘फिश-ओ-क्राफ्ट’द्वारे रोजगारनिर्मिती राज्यातील पहिला अभिनव उपक्रम – मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख

 


मुंबई, दि. 2 : मत्स्य कातडीपासून वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन उद्योग सुरू करण्याला प्रोत्साहन देण्याचा राज्यात पहिल्यांदाच प्रयोग करण्यात येत असून फिश-ओ-क्राफ्टद्वारे रोजगार निर्मिती हा राज्यातील पहिला अभिनव उपक्रम आहे. राज्याच्या मत्स्यव्यवसाय विकास विभागाने उचललेले हे क्रांतीकारी पाऊल आहे. यामुळे नवयुवक आणि मच्छिमार महिलांना नवीन उद्योग व रोजगार प्राप्ती होणार आहे. शासन नव उद्योगाला सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी माहिती मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

 

तारापोरवाला मत्स्यालय येथे फिश-ओ-क्राफ्ट कौशल्य विकास या दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. 2 व 3 डिसेंबर रोजी सुरू असणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनपर भाषणात मंत्री अस्लम शेख बोलत होते.

 

या कार्यक्रमास मत्स्यविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त डॉ.अतुल पाटणे आदींसह अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

 

मंत्री श्री. शेख म्हणाले, जागतिक स्तरावर माशांच्या कातड्यापासून विविध वस्तू बनविण्यात येतात. शासनाने टाळेबंदीच्या काळातही मच्छिमारांना सहकार्य केले आहे. फिश ओ क्राफ्ट या कौशल्यपूर्ण कार्यक्रमाद्वारे मच्छिमारांना आणि नव-तरूणांना नव-उद्योग करण्याची संधी प्राप्त होणार आहे. मत्स्यव्यवसाय करण्याव्यतिरिक्त उद्योग करण्याची नवी संधी शासनाने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी विनामुल्य प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रमही राबविण्यात येत आहे. हा एक क्रांतीकारी उपक्रम असून, राज्यातील विविध जिल्ह्यातही हा उपक्रम पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न असणार आहे. याचबरोबर मत्स्यव्यवसाय विभागाच्या विकासासाठी असणाऱ्या नवीन सुचनांचे शासन स्वागत करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य मत्स्यव्यवसाय विभाग करीत आहे. माशांच्या कातडीपासून विविध वस्तू बनविण्याचा हा उपक्रम जास्तीत जास्त मच्छिमार बांधवांपर्यंत पोहोचल्यास एक नवीन उद्योग सुरू करण्यास मदत होणार आहे. यामुळे मच्छिमार बांधवांचा विकास होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

आयुक्त डॉ.अतुल पाटणे म्हणाले, राज्यात प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईला 75 टक्के किनारा लाभला असून, मुंबई ही एक मोठी बाजारपेठ असल्याने हा उद्योग करताना मच्छिमार बांधवांना अडथळे येणार नाहीत. जवळपास 40 ते 50 मच्छिमार बांधव आणि इतर प्रशिक्षणार्थी या प्रशिक्षणाचा लाभ घेणार आहेत. माशांच्या कातडीवर संशोधन होणे ही काळाची गरज आहे. मत्स्य कातडी पासून उत्पादने आदींचे प्रशिक्षण प्रात्यक्षिकांसह कौशल्य विकास प्रशिक्षणामार्फत देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ.पाटणे यांनी यावेळी दिली.

००००

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area