नागपूर शहराला २४ तास शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठीच्या कामास गती द्यावी – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

 


मुंबई, दि. 17 : नागपूर शहराला शुद्ध आणि चोवीस तास पाणी मिळण्यासाठी योग्य पद्धतीने उपाययोजना करण्यात यावी. चोवीस तास पाणी पुरवठा राबविण्यासाठी कंत्राट दिलेल्या कंपनीच्या कामासंदर्भात अहवाल तयार करून चौकशी करण्यात यावी. यासंदर्भात विशेष लेखापरिक्षण करण्यात यावे, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

 

विधानभवन येथे नागपूर शहराला २४ X ७ तास पाणीपुरवठा करण्यासाठी कंत्राट दिलेल्या कंपनीच्या कामकाजासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस नागपूरचे पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, नागपूरचे आयुक्त बी राधाकृष्णन, नगरविकासचे उपसचिव सतिश मोघे, उपसचिव पी.जी. जाधव, अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, आमदार विकास ठाकरे, नगरसेवक संजय महाकाळकर, प्रफुल्ल गुडधे, वेदप्रकाश आर्य, दुतेश्वर पेठे आदींसह नगरविकास विभागाचे आणि नागपूर महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी २४ तास पाणीपुरवठा कराराच्या अंमलबजावणी संदर्भात सांगितले, ऑरेंज सिटी वॉटर कंपनीने करारानुसार करावयाच्या कामांना विलंब केला. करारानुसार तांत्रिक कार्यक्षमता पहिल्या 10 वर्षात 75 टक्के तर व्यावसायिक कार्यक्षमता १० वर्षात ९५ टक्के होणे आवश्यक होते मात्र, या कालावधीत वाढ करून १५ वर्षे करण्यात आला आहे. याचबरोबर करारनाम्यानुसार योजनेवर खर्च करण्यात आला नसल्याने त्याचा फायदा संबंधित कंपनीस झाला आहे. यामुळे जनतेच्या पैशांचा अपव्य झाला असल्याचे माहिती पालकमंत्री डॉ.राऊत यांनी सांगितले.

 

विधानसभा अध्यक्ष श्री.पटोले म्हणाले, नागपूर शहराला २४ तास पाणीपुरवठा राबविण्यासाठी कंत्राट दिलेल्या ऑरेंज सिटी वॉटर कंपनीच्या करारातील निकष, योजना राबविण्यासाठी झालेला विलंब या सर्व बाबी तपासून पहाव्यात व यामध्ये काही अनियमितता झाली आहे का याची पडताळणी करुन अहवाल सादर करावा. नागपुरवासियांना २४ तास पिण्यासाठी चांगल्या प्रतीचा पाणी पुरवठा करण्यात यावा यासाठी प्रयत्न करण्यात यावे असेही अध्‍यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

००००

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area