इचलकरंजी/प्रतिनिधी -
सूत व्यापार्यांकडून सूताची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. यंत्रमाग उद्योग हा उत्पादक घटक असल्याने उद्योग बंद ठेवता येत नसल्याचे त्याचा गैरफायदा घेऊन सूत व्यापारी सूताची अनैसर्गिक दरवाढ करीत आहेत. या प्रश्नी स्थानिक सूत व्यापारी व यंत्रमागधारक संघटना प्रतिनिधींनी बैठक घेऊन सुताचा काऊंट, वजन, बिले आदी आवश्यक मुद्यांवर प्रत्यक्ष चर्चा करणे आवश्यक असल्याने संयुक्त बैठक बोलावून हा प्रश्न मार्गी लावावा, अशा मागणीचे निवेदन सोमवारी इचलकरंजी क्लॉथ मॅन्युफॅक्चरिंग असोशिएशन यांच्यावतीने प्रांताधिकारी यांना देण्यात आले.निवेदनात, मार्च 2020 पासून संपूर्ण देशभरात कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. या महामारीमुळे गत 6 ते 7 महिन्यांपासून इतर नुकसानीबरोबरच उद्योगधंद्याचेही नुकसान झाले आहे. त्यात यंत्रमाग उद्योगाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून अद्यापपर्यंत नुकसानीचा सिलसिला चालूच आहे. त्यातच सूताची दरवाढ हे नवीन संकट यंत्रमाग उद्योगासमोर उभे ठाकले आहे. शहरातील सर्व प्रकारच्या यंत्रमागधारकांना निरनिराळ्या प्रकारच्या सूताची कच्चा माल म्हणून आवश्यकता असते. या सूताचा स्थानिक व्यापार्यांच्याकडून पुरवठा केला जातो. परंतु दोन 2 महिन्यांपासून सूत दरात भरमसाठ वाढ केली जात आहे. मात्र त्या प्रमाणात कापडाला दर मिळत नसल्याने यंत्रमाग उद्योजकांना नुकसानीमध्येच कापड विकावे लागत आहे. सूताची बाचकी ठेवण्यास जागा नाही अशी परिस्थिती असतानाही सूताचा साठा करून सूत व्यापारी सूत दरात भरमसाठ वाढ करीत आहेत. या संदर्भात स्थानिक सूत व्यापारी व यंत्रमागधारक संघटनांची बैठक घेणे आवश्यक आहे. या बैठकीत या संदर्भातील सर्वच मुद्यांवर प्रत्यक्ष चर्चा करणे आवश्यक असल्याने स्थानिक सुत व्यापारी यांच्याबरोबर यंत्रमागधारक संघटनांची बैठक घ्यावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी सतिश कोष्टी, पुंडलिक जाधव, सागर चाळके, प्रकाश मोरे, राजाराम धारवट, राजगोंडा पाटील, विनय महाजन, पांडुरंग धोंडपुडे, गोरखनाथ सावंत, विश्वनाथ मेटे, सुनिल मेटे, विकास चौगुले, श्रीशैल कित्तुरे, अमित गाताडे, विनोद कांकाणी यांच्यासह पदाधिकारी व यंत्रमागधारक उपस्थित होते.