मुंबई, दि 4 :- सोलापूर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना युनेस्को व लंडनच्या वार्की फाउंडेशनतर्फे संयुक्तपणे दिला जाणारा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. रणजितसिंह डिसले यांना जाहीर झालेला पुरस्कार ग्रामीण भागातील शिक्षकांचा गौरव वाढवणारा तसेच ग्रामीण भागातील शिक्षण चळवळीला बळ देणारा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
रणजितसिंह डिसले यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला. उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांनी केलेले कार्य देशातीलच नव्हे तर, जगभरातील शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून त्यांनी घडवून आणलेल्या शैक्षणिक क्रांतीची दखल घेऊन १४० देशांतील १२ हजार शिक्षकांतून त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी झालेली निवड राज्याचा व देशाचा गौरव आहे. पुरस्कार स्वरूपात मिळणारी ७ कोटी रुपयांची रक्कम इतर देशातील शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी तसेच ‘टीचर इनोव्हेशन फंड’साठी वापरण्याचा त्यांचा निर्धार त्यांचे वेगळेपण सिद्ध करणारा आहे. भारताला गुरुशिष्य परंपरेचा गौरवशाली इतिहास आहे. रणजितसिंह डिसले यांनी ही परंपरा केवळ पुढे नेली नाही तर, या परंपरेचा गौरव वाढवण्याचं काम केलं आहे. त्यांना जाहीर झालेला ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ राज्यातील आणि देशातील शैक्षणिक चळवळीला नवीन दिशा व गती देईल, असा मला विश्वास वाटतो. रणजितसिंह डिसले यांचे मनापासून अभिनंदन, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला आहे.