नेदरलँड वाणिज्य दूतावास आणि पर्यावरण विभागामध्ये सामंजस्य करार

 


मुंबई, दि. 11 : पर्यावरण विभाग आणि किंगडम ऑफ नेदरलँड्सचे वाणिज्य दूतावास यांच्यामध्ये राज्याचे पर्यावरण मंत्री श्री.आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. नेदरलँडचे मुंबईतील कौन्सुलेट जनरल श्री. बार्ट डी जोंग आणि पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. सांडपाणी, प्लास्टीकसारख्या घनकचऱ्याचा पुनर्वापर, नद्यांची स्वच्छता, शाश्वत अर्थव्यवस्थेचा विकास आदी क्षेत्रांमध्ये याद्वारे एकत्रीतरित्या काम केले जाणार आहे.

 

प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री. सुधीरकुमार श्रीवास्तव, मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, नेदरलँड कौन्सुलेटच्या सिनिअर इकॉनॉमी पॉलीसी ऑफिसर श्रीमती प्रिया अनिल आदी यावेळी उपस्थित होते.

 

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, या सामंजस्य कराराच्या माध्यमातून नेदरलँड आणि महाराष्ट्रातील संबंध अधिक वृद्धींगत होतील. पर्यावरण रक्षणासाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात काम होत आहे. यामध्ये आता नेदरलँड वाणिज्य दूतावासाचे सहकार्य मिळणार असल्याने या कामास निश्चितच चालना मिळेल, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.

 

कौन्सुलेट जनरल बार्ट डी जोंग म्हणाले की, भारत तसेच महाराष्ट्रासमवेतचे नेदरलँड्सचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी या सामंजस्य करारातून निश्चितच चालना मिळेल. हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी दोन्ही बाजूंनी सामील असलेल्या सर्वांचे समर्पण आणि प्रयत्न पाहून आनंद झाल्याचे जोंग यांनी सांगितले.

 

पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर म्हणाल्या की, राज्यात पर्यावरण रक्षणामध्ये ‘माझी वसुंधरा’सारख्या अभियानातून लोकसहभागावर भर देण्यात येत आहे. नेदरलँड् वाणिज्य दूतावासाच्या सहकार्यातून सांडपाण्याचा पुनर्वापर, घनकचरा व्यवस्थापन, नद्यांची स्वच्छता आदी क्षेत्रातील मोहीम अधिक गतिमान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

००००

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area