अतिरिक्त 95 कोटीच्या मागणीसह 366 कोटी प्रस्तावाच्या ठरावास मंजुरी निधी 100 टक्के खर्च करण्याचे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचे निर्देश
कोल्हापूर, दि. 24 : शासनाकडे केलेली अतिरिक्त 95 कोटीच्या मागणीसह 366 कोटी प्रस्तावाच्या ठरावास आज मंजुरी देण्यात आली. सर्व विभागांनी दिलेला निधी 100 टक्के खर्च करावा त्यानुसारच पुढील वर्षाचा निधी दिला जाईल, असे निर्देश पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी आज दिले.
जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात झाली. बैठकीस सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बंजरंग पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार राजू आवळे, आमदार प्रकाश आवाडे, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलवकडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण आदी उपस्थित होते.
सुरुवातील पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते नुतनीकरण केलेल्या ताराराणी सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर झालेल्या सभेत जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांनी सुरूवातीला सर्वांचे स्वागत करुन संगणकीय सादरीकरण केले. आमदार श्री. आवाडे यांच्या प्रश्नावर पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, इचलकरंजी, कोल्हापूर लक्ष्मीपुरी येथील पोलीसांच्या निवासस्थानाबाबत नुकत्याच झालेल्या मंडळाच्या बैठकीत तत्वत: मान्यता दिली आहे. जिल्हा नियोजन मधून त्यासाठी निधी देतोय. जिल्ह्यातील 31 पोलीस ठाण्यापैकी 15 पोलीस ठाण्यांना अत्याधुनिक करण्याच्या दृष्टीकोनातून प्रत्येकी 15 लाखाचा निधी दिला आहे. चंदगड येथील जुने तहसिल कार्यालय पोलीस ठाण्यासाठी देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
ग्रामपंचायतीमधील स्ट्रीट लाईट सुरु करण्याबाबत महावितरणचे अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित बैठक घेवून मार्ग काढावा. कोरोना काळात काम केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत घेण्याबाबत प्राधान्य द्यावे, याबाबत शासनाला कळविले जाईल, असेही पालकमंत्री म्हणाले.
ऑप्टीकल फायबर, गॅस पाईप लाईन याबाबत रस्ते खुदाई झालेल्या ठिकाणी इचलकरंजी प्रांताधिकाऱ्यांनी भेट देवून अहवाल सादर करावा, असे निर्देश देवून पालकमंत्री म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी दि. 27 जानेवारी रोजी या सर्व यंत्रणांची एकत्रित बैठक घ्यावी.
आमदार श्री. आबिटकर यांनी मांडलेल्या सुचनेवर पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, पुढच्या बैठकीला पाच विभागाच्या प्रमुखांनी सादरीकरण करुन झालेला निधी खर्च तसेच कामाचा आढावा सादर करावा. शेणापासून खत निर्मिती, फवारणी प्रकल्पाचा प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी मागवून तो मंजूर करावा.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बॉटनिकल गार्डन आणि सुसज्ज स्मारक प्रस्ताव द्या- पालकमंत्री
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, महापालिका हद्दीत हिंदुह्दयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बॉटनिकल गार्डन आणि सुसज्ज स्मारक व्हावे. त्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून यावर्षी आणि पुढच्या वर्षी निधी द्यावा. यावर पालकमंत्री श्री. पाटील यांनी महापालिका आयुक्तांनी याबाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश दिले.


नाविन्यपूर्ण योजनेमधून जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी राबविलेला सार्वजनिक घोषणा प्रणाली सर्वत्र राबविण्यात येणार आहे. याला सीसीटीव्हीची तरतूद करण्यात येणार असून टप्या टप्याने दोन, तीन वर्षात जिल्ह्यात सर्वत्र राबविली जाईल. यामध्ये पुराच्या गावांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी याबाबत माहिती दिली. मोबाईल, इंटरनेट आणि एफएम वाहिनी यावर ही यंत्रणा काम करणार आहे. यावरुन सर्वत्र संदेश पोहचविण्यात येईल. तहसिलदार कार्यालयात याचे नियंत्रण असेल.
क वर्ग यात्रा स्थळे
आजच्या बैठकीमध्ये पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी, दिगवडे, कोदवडे. शाहूवाडी तालुक्यातील सावे, कासार्डे, बुरंबाळ, चरण, अनुस्कुरा, अमेणी, कोपार्डे, शिवारे, पाटणे, शाहूवाडी, तुरकवाडी, परखंदळे, शिराळे तर्फ मलकापूर, उखळू, भेडसगाव, नेर्ले. शिरोळ तालुक्यातील हेरवाड. हातकणंगले तालुक्यातील मिणचे, मागणाव. गगनबावडा तालुक्यातील आणदूर, करवीर तालुक्यातील धोंडेवाडी, वसगडे, कळंबे तर्फ कळे येथील यात्रा स्थळांना क वर्ग मान्यता देण्यात आली.
नाविन्यपूर्ण योजना मान्यता
• डिजीटल इंडिया लँड रेकॉर्डस मॉडर्नायझेशन प्रोग्रॅम अंतर्गत ई-फेरफार आज्ञावलीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 452 तलाठी यांच्या करीता डुप्लेक्स प्रिंटर उपलब्ध करुन देणे.
• कृषी पीक उपद्रवी किड नियंत्रणासाठी मित्र कीडीचे उत्पादन व वाटप करणे- जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे भाजीपाला, फलपीके इतर कृषी पीकांमध्ये होणाऱ्या विविध उपद्रवी किटकांचा बंदोबस्त करणे. शेती व शेती सलग्न क्षेत्रात किड नियंत्रणासाठी किटक नाशके, रसायनाचा वापर कमी होईल. मित्र किडीचा वापर पर्यावरण पुरक, आरोग्यदायी पिकांची उत्पादकता व गुणवत्ता वाढीसाठी उपयोगी ठरेल. उद्योग, रोजगार, कुशल मनुष्यबळ निर्मितीस सहायक होईल.
• पर्यावरण पूरक पध्दतीने सार्वजनिक आरोग्यासाठी घर माशींचे नियंत्रण- पर्यावरणास गाव, शहरात सातत्याने होणाऱ्या घर माशीची उत्पत्ती, वावर आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक आहे. मित्र किडींची निर्मिती आणि वापर वाढवून घर माशीपासून होणाऱ्या विविध रोगांचा बंदोबस्त करण्यात येईल. गाव ते शहर पातळीवर घर माशांचा बंदोबस्त झाल्याने सार्वजनिक आरोग्य, स्वतंत्र भारत-स्वस्त भारत पर्यावरण पुरक संकल्पनेस पुरक व्यवस्था निर्माण होईल. अन्न व अन्न प्रक्रिया गुळ, साखर, मास, फळे, भाजीपाला व्यवसायामुळे निर्माण होणाऱ्या घर माशांचा बंदोबस्त करण्यात उपयोगी ठरेल.
• सॉईल टू सिल्क- जिल्ह्यात तुती लागवड, रेशीम किटक संगोपन, व्यावसायिक चॉकी किटक संगोपन, अंडी पुंज व रेशीम धागा वस्त निर्मितीसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण, कुशल मनुष्यबळ निर्मिती, शेतकरी सल्ला व गरजेनुसार प्रशिक्षण, कोष उत्पादकता आणि गुणवत्तेत वाढ होईल.
• वळीवडे ता. करवीर येथील पोलंड वासीयांचे वास्तुचे संग्रहालय कामी प्रदर्शन हॉल बांधणे.
• न्यायालयाच्या अधिपत्याखालील तालुका न्यायालयात सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे.
• कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत शिवाजी विद्यापीठ हायवे कँटीन व डीओटी पर्यंत सायकल ट्रॅक करणे.
• आपत्ती व्यवस्थापन कामी जिल्ह्यातील सर्व ठिकाणी पूर्वसूचना देणे, जाणिव जागृती करणे कामी सार्वजनिक घोषण प्रणाली उभारणे.
• तहसिल स्तरावर व्हीसी रुम तयार करणे.
• जिल्ह्यातील 80 शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांसाठी सन 2019-20 मधील विविध विषयावरील प्रकाशित पुस्तके उपलब्ध करुन देणे.
• दिव्यांग व्यक्तींना क्रीडा साहित्य व इतर उपकरणे उपलब्ध करणे.
• सेनापती कापशी येथे वॉटर मीटर बसविणे.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area