प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातील जनतेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

 


  • देशाच्या स्वातंत्र्यासाठी व जडणघडणीत योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिक, विविध क्षेत्रातील मान्यवरांबद्दल कृतज्ञता

मुंबई, दि. 27 :- देशाच्या स्वातंत्र्यासाठी तसेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित ठेवण्यासाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या शहीद वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावपूर्ण अभिवादन केले असून राज्यातील जनतेला तसेच देशवासियांना भारतीय प्रजासत्ताकाच्या ७१ व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७१ व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आपला देश स्वतंत्र झाला, प्रजासत्ताक झाला, त्यावेळचा काळ देशासाठी खूपच कठीण काळ होता. देशासमोर अनेक आव्हाने होती. परंतु गेली ७१ वर्षे हे प्रजासत्ताक आपण टिकवले, वाढवले, सुरक्षित केले. जगातल्या इतर देशात लोकशाहीला धक्के बसत असताना आपली लोकशाही सुरक्षित राहिली, याचे श्रेय देशातील जनतेला आणि जनतेच्या लोकशाहीवरच्या विश्वासाला आहे. भारतीय लोकशाही व्यवस्थेवर, भारतीय राज्यघटनेवर अढळ विश्वास असलेल्या तमाम देशवासियांना मी वंदन करतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या, देशाच्या जडणघडणीत योगदान दिलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या योगदान, त्यागाबद्दलही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. भारतीय प्रजासत्ताकाच्या ७१ वर्षांच्या वाटचालीत देश घडविण्यासाठी योगदान दिलेल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मपुरस्कारांनी सन्मानित झालेल्या मान्यवरांचे, राष्ट्रपती पदकांनी सन्मानीत झालेल्या राज्याच्या पोलीस, अग्निशमन, तुरुंग सेवेतील पुरस्कार विजेत्यांचे, ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’विजेत्या राज्यातील बालकांचेही उपमुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area