‘शौर्य, धैर्याची महाराष्ट्राची प्रतिमा आणखी उंचावली’ – मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रपती पदक विजेत्यांचे अभिनंदन

 


मुंबई, दि. 26 :- महाराष्ट्राला इतरांच्या रक्षणासाठी धावून जाण्याची परंपरा आहे. या परंपरेत शौर्य आणि धैर्यासाठीचे मानाचे पदक पटकावून या आपल्या बहाद्दरांनी महाराष्ट्राची प्रतिमा आणखी उंचावली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदक पटकाविणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी, तसेच जीवन रक्षा आणि अग्निशमन सेवा पदक पटकाविणाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

या सर्वांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी म्हटले आहे की, ‘ महाराष्ट्र म्हटले की, इतरांच्या रक्षणासाठी आघाडीवर राहणारा प्रदेश अशी ओळख आहे. ही महाराष्ट्राची दिमाखदार परंपरा पोलीस दलात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या शूरवीरांसह,  इतरांच्या बचावासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावणारे आणि आगीसारख्या दुर्घटनेत सर्वात पुढे राहणाऱ्या बहाद्दरांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने उजळून टाकली आहे. महाराष्ट्राच्या पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी आणि अग्निशमन दलातील शूरवीरांनी कोरोना काळातही अजोड अशी कामगिरी बजावली आहे. या सर्वांना त्यांच्या कामाची राष्ट्रीयस्तरावरून दाद मिळते आहे. ही महाराष्ट्रासाठीही गौरवशाली बाब आहे. या सर्वांच्या कामगिरीतून या क्षेत्रात येणाऱ्या होतकरू पिढ्याही निश्चितच प्रेरणा घेतील. या पुरस्कारासाठी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. तसेच त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीत त्यांना साथ देणाऱ्या कुटुंबियांचे आणि जीवलगांचे, मार्गदर्शक यांचेही अभिनंदन.’

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारकडून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय आणि सर्वोच्च अशा कामगिरीसाठी पदक विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी, अग्निशमन सेवा, कारागृह सेवा आणि नागरी क्षेत्रातील कामगिरीसाठी जीवन रक्षक पदक पुरस्कार जाहीर झाले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area