विकास कामे गुणवत्तापूर्वक व वेळेत पूर्ण करा : पालकमंत्री एकनाथ शिंदे

 


यावर्षी 2020-21 साठी सुधारीत अर्थसंकल्पित 439.74 कोटींची तरतूद

पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा संपन्न

 

गडचिरोली, दि.31 : पालकमंत्री तथा नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन विभागाच्या सभागृहात पार पडली. यावेळी त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करण्याचे तसेच त्यानिधीतून गुणवत्तापूर्ण काम कसे होईल याबाबत अधिकाऱ्यांना लक्ष घालून काम करावे असे निर्देश दिले. कोरोना काळात निधी बाबत प्रश्न निर्माण झाले होते मात्र आता शंभर टक्के निधी जिल्हा वार्षिक मधून वितरीत करण्यात आला आहे. मंजूर कामे करण्यासाठी वेळ कमी असला तरी ती वेळेत पूर्ण करताना कोणत्याही प्रकारे गुणवत्तेमध्ये बदल करता कामा नये अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या. यावर्षी 2020-21 साठी सुधारीत अर्थसंकल्पित 439.74 कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी 38 टक्के खर्चही झाला आहे. पुढील वर्षीच्या प्रारूप आराखड्यावर या बैठकीत चर्चा झाली. पुढील वर्षासाठी 356.39 कोटी प्रस्तावित करण्यात आले आहेत  तर अतिरीक्त मागणी 510.18 कोटींची आहे. याबाबत जास्तीत जास्त निधी जिल्ह्यासाठी मिळवून देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी बैठकीत आश्वासन दिले. येत्या 8 फेब्रुवारीला प्रारूप आराखड्यावर मुंबई येथे बैठक होणार असून शासनाकडून निश्चितच आकांक्षित गडचिरोली जिल्ह्यासाठी जास्तीचा निधी मंजूर करून घेवू असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. मागील वर्षी सन 2019-20 मध्ये 99.68 टक्के म्हणजेच 480.83 कोटी झाला खर्च झाला असून यावरही यावेळी चर्चा करण्यात आली.

 

आज उपस्थितामध्ये प्रधान सचिव, नगरविकास महेश पाठक, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, खासदार अशोक नेते, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आर्शिवाद, सर्वश्री आमदार धर्मराव आत्राम, कृष्णा गजबे, डॉ.देवराव होळी, रामदास आंबटकर, अभिजीत वंजारी, प्रकल्प अधिकारी मनोज जिंदाल व आशिष येरेकर उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा वार्षिक आराखडयाचे सादरिकरण जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके यांनी केले.

 

विविध विकास कामांचे लोकर्पण : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी प्रशासकीय इमारत, बाल रुग्णालय, आरमोरी, उपविभागीय व तहसिल कार्यालय कुरखेडा, मायक्रो एटिएम इ. कामांचे लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने पार पडले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या कामांची प्रशंसा पालकमंत्र्यांनी केली. आरमोरी व कुरखेडा मधील सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आली आहेत.

 

जिल्ह्यातील विविध समस्यांवरही चर्चा : जिल्हा वार्षिक योजनेतून विविध कामांची अंमलबजावणी करताना आलेल्या अडचणी व इतर विकास कामांमधील अडचणींवर उपसिथत लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केले. यावेळी वन विभागाकडून आवश्यक असलेल्या मंजूरी वेळेत देणेबाबतचे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिले. आदिवसी व दुर्गम भागातील विकास प्रक्रियेत वन विभागाकडून अडचणी निर्माण होता कामा नये तसेच जिल्ह्याचा विकास करून नक्षलवाद कमी करायचा आहे. यासाठी सर्व विकासाठी लागणाऱ्या परवानग्या तातडीने द्याव्यात असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यातील धान खरेदी बाबत असलेल्या अडचणीवरही चर्चा झाली. वन पट्टेधारक शेतकऱ्यांच्या धान खरेदीमधील अडचणी राज्य स्तरावरून सोडविण्यात आले आहेत. त्यांचे धान खरेदी ऑनलाईन होत असल्यामुळे त्यामध्ये काही अडचणी होत्या. त्या आता दूर झाल्या आहेत. तसेच अतिक्रमण क्षेत्रातील शेतकऱ्यांचे धान खरेदीबाबत शासनाला प्रस्ताव पाठवून त्यावरही तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले.

****

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area