शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद; विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत येण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

 


पुणे, दि. 30 : शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद असून भावी काळात विद्यार्थ्यांनी भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत दाखल व्हावे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

 

पूर्व उच्च माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2020 मध्ये पुणे जिल्ह्यातील गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या 106 विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या सभागृहात सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.  त्यावेळी आयोजित गुणगौरव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, महिला व बालकल्याण सभापती पूजा पारगे, सारीका पानसरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनील कुऱ्हाडे उपस्थित‍ होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोरोनाची सर्वात जास्त झळ विद्यार्थ्यांना सोसावी लागली आहे. सगळेच विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेऊ शकले नाहीत. पण काळाप्रमाणे सर्वांनी बदलले पाहिजे असे सांगून ते म्हणाले मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग व्यवहारात कौशल्य मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. अजूनही कोरोनाबाबतची खबरदारी विद्यार्थी आणि शिक्षकांनी घेतली पाहिजे. शाळेमध्ये मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे, सॅनिटायझरचा वापर करावा आदी सूचना त्यांनी दिल्या.

श्री. पवार म्हणाले, करिअर निवडताना वडिलधाऱ्यांचा सल्ला घ्या, स्पर्धा परीक्षेमध्ये पुढे या. प्रशासकीय सेवेत दाखल झाल्याने निर्णय घेता येतात, अंमलबजावणी करता येते असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. काही मुलांनी आवडीनुसार शेतीही करावी. शेतीतही चांगले करिअर करता येते परंतु धाडस करणे गरजेचे आहे. ज्या क्षेत्रात उतराल त्यात आपल्या आई-वडिलांचे नाव करा, असे सांगून कष्ट करत रहा, नाविन्याचा ध्यास घ्या, नैतिकतेचा विसर पडू देऊ नका, प्रामाणिकपणे वागा, कुणाची फसवणूक होणार नाही याची खबरदारी घ्या, चांगले मित्र-मैत्रिणी निवडा, व्यायाम करा, आरोग्य सांभाळा, कितीही यश मिळाले तरी आई-वडिलांना विसरु नका, असा सल्ला श्री.पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला. शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी खुली आहेत, त्याला विद्यार्थ्यांनी साथ द्या असे सांगून यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक त्यांनी केले.

 

त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी केले.

 

प्रास्ताविकात शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी त्यांनी माहिती दिली. शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

फिरत्या पशुचिकीत्सा व्हॅनचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

 

मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेंतर्गत फिरते पशुचिकित्सा व्हॅनचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत संपन्न झाला.

 

यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपसभापती रणजीत शिवतरे तसेच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area