परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम तीर्थक्षेत्राबाबत ग्रामविकास आणि पर्यटन विभागाने संयुक्त बैठक घ्यावी

 


मुंबई, दि. 20 : राज्यस्तरीय तीर्थक्षेत्र ब वर्ग प्राप्त असलेल्या नागपूरजवळील परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम, पावडदौना येथे तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ विकसित करण्याच्या कामांना त्वरित चालना द्यावी. त्यादृष्टीने पर्यटन आणि ग्रामविकास विभागाने तातडीने संयुक्त बैठक घेऊन बृहत आराखडा अंमलात आणण्यासाठी कार्यवाही करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली.

विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले म्हणाले, या तीर्थक्षेत्राला छत्तीसगड, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश अशा सीमा भागातील हजारो भाविक आणि पर्यटक भेट देत असतात. येथे रस्ते व अन्य सुविधा उपलब्ध करुन द्याव्या. तीर्थस्थळासह पर्यटनस्थळ निर्मितीच्या दृष्टीने या प्रस्तावाला मान्यता देणे गरजेचे आहेत. त्यासाठी ग्रामविकास आणि पर्यटन विभागाने संयुक्त बैठक घेऊन हा प्रस्ताव त्वरित मार्गी लावण्याच्या सूचना श्री. पटोले यांनी यावेळी दिल्या.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, या तीर्थक्षेत्राच्या विकासाला नक्कीच प्राधान्य देण्यात येईल. तीर्थस्थळासह पर्यटनस्थळ निर्मिती करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. रस्त्यांची कामे ग्रामविकास विभागामार्फत करण्यासाठी ग्रामविकास आणि पर्यटन विभागाची संयुक्त बैठक घेण्यात येईल.

येथे भाविकांची संख्या वाढती असल्याने त्यासाठी वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा, त्या माध्यमातून भाविकांसाठी पायाभूत सुविधा, रस्ते, विश्रामगृह, मनोरंजनासाठी लाईटिंग शो अशा सुविधा उभारता येतील. त्यासाठी अंदाजे 44 कोटी रूपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तो प्रस्ताव मान्य करण्याची मागणी परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष राजू मदनकर यांनी यावेळी केली.

या बैठकीला पर्यटन विभागाचे प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव राजेंद्र जवंजाड, विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिव विलास आठवले उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area