इचलकरंजीत एका युवकाचा निर्घृण खून
इचलकरंजी/प्रतिनिधी –

हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील खूनाच्या घटनेला 24 तास उलटण्यापूर्वीच  बुधवारी इचलकरंजीत एका युवकाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. शांतीनगर परिसरातील कत्तलखान्याच्या पिछाडीस असलेल्या निर्जनस्थळी एखादी जड वस्तू घालून हा खून करण्यात आला आहे.

 त्याच्या चेहर्‍याचा चेंदामेंदा केल्याने ओळख पटविण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. सलग दोन दिवसात दोन खूनाच्या घटना घडल्याने शहरात खळबळ माजली आहे. दरम्यान, पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेत तपासाच्या सूचना केल्या.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शांतीनगर परिसरात असलेल्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) च्या मागील बाजूस अत्यंत निर्जन असे ठिकाण आहे. याठिकाणी एका युवकाचा मृतदेह पडला असल्याची माहिती फोनवरुन कोणीतरी पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता तीस ते पस्तीय वर्षीय युवकाचा मृतदेह मिळून आला.

 त्याच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार करुन खून करण्यात आल्याचे निदर्शनास आले. या तरुणाचा चेहरा ठेचण्यात आल्याने त्याची ओळख पटविताना अडचणी येत होत्या. खूनाची माहिती समजताच घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती. घटनास्थळी पोलिसांना एक जोड चप्पल, दारूची बाटली तसेच नशेचे साहित्य मिळून आले. 

मृतदेह मिळाल्यापासून थोड्या अंतरावर  खून करून नंतर मृतदेह फरफटत नेऊन घटनास्थळी टाकण्यात आल्याचे तपासात समोर आले. मृतदेहाची तपासणी केली असता त्याच्या खिशात ओळख पटण्यासारखे काहीच मिळून आले नाही.

 त्याच्या पॅण्टला एक चावी मिळून आल्याने परिसरात वाहनाचा शोधही घेण्यात आला. पण वाहनही मिळून आले नाही. मृताची ओळख पटल्यानंतरच  खून कोणी केला, कोणत्या कारणातून झाला हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे प्रथमत: ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड, पोलिस उपअधीक्षक बी. बी. महामुनी, गावभाग पोलिस ठाण्याचे सपोनि गजेंद्र लोहार, स्थानिक गुन्हे शाखेचे विकास जाधव आदींनी  घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. परंतु ओळख पटण्यासारखे काहीच मिळून आले नाही.

इचलकरंजी-हातकणंगले मार्गावरील कोरोची माळावर मंगळवारी रात्री शुभम उमेश कमलाकर (रा. कोरोची) या तरुणाचा अज्ञातांनी दगडाने ठेचून निर्घृण खून केला.  त्या खूनाने नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसताना शांतीनगर परिसरात झालेल्या खूनाच्या घटनेने खळबळ उडाली आहे.


मृतदेह मिळून आलेल्या युवकाचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षे असून त्याचा चेहरा उभट, बारीक कोरीव दाढी, गव्हाळ रंग, अंगात निळ्या रंगाची जीन्स व निळ्या रंगाचा पांढरे ठिपके असलेला फुल शर्ट मिळून आला आहे. त्यांची उंची 5 फुट 8 इंच असून गळ्यामध्ये रुद्राक्ष व तावीज तसेच  उजव्या छातीवर ‘आई’ असे लिहिलेले आहे. या वर्णनाची व्यक्ती हरवलेली असल्यास अथवा कोणाशी संबंधित असल्यास त्यांनी गावभाग पोलीस ठाण्याशी (2422200) संपर्क साधावा असे आवाहन प्रभारी पोलिस निरिक्षक गजेंद्र लोहार यांनी केले आहे 
Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area