पुणे, दि.१२ : एमपीएससी आंदोलन प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पडळकर आणि सहकाऱ्यांना रात्री अटक करून जामिनावर सोडून देण्यात आलं आहे. काल पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेला रस्ता आता पूर्ववत सुरु झालेला आहे. मात्र, पोलिसांच्या दोन गाड्या बंदोबस्तासाठी या ठिकाणी अद्यापही आहेत. काल रात्री उशिरा पोलिसांनी दडपशाही करत आंदोलन मोडीत काढले होते त्यानंतर विद्यार्थी आपापल्या रूमवर निघून गेले. पोलीस दंगल नियंत्रण पथकाच्या 4 गाड्या आंदोलन स्थळी दाखल आहेत.
दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या MPSCची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने काल राज्यभर त्याचे पडसाद उमटले. पुण्यासह काही प्रमुख शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं. पुण्यात झालेल्या आंदोलनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे देखील सहभागी झाले होते. दुपारपासून पुण्यातील नवी पेठेत रस्त्यावर ठिय्या मारलेल्या पडळकरांना पोलिसांनी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतलं होतं. तसेच आंदोलक विद्यार्थ्यांना पांगवलं. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा रस्त्यावर उतरला होता. दरम्यान, सरकारकडून विद्यार्थ्यांची दडपशाही सुरु असून जोपर्यंत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहिलं असा इशारा या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला दिला होता.
राज्यभरातून विद्यार्थ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर आणि सर्वपक्षीय नेत्यांनी याला विरोध केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री साडेआठ वाजता सोशल मीडियावरुन व्हिडिओद्वारे संवाद साधत येत्या आठ दिवसांत MPSCची परीक्षा घेण्यात येईल असं आश्वासन दिलं. तसेच उद्याच याची तारीखही घोषीत करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं.