बॅंक कर्मचाऱ्यांचा संपामुळे कोल्हापूर जिल्ह्यात 700 कोटींची उलाढाल ठप्प

 खासगीकरणाच्या विरोधात राष्ट्रीयकृत बॅंकांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील सुमारे 700 कोटींहून अधिक उलाढाल आज थांबली, उद्या (ता.16) रोजीही राष्ट्रीय बॅंका बंद राहणार आहेत.
कोल्हापूर : खासगीकरणाच्या विरोधात राष्ट्रीयकृत बॅंकांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील सुमारे 700 कोटींहून अधिक उलाढाल आज थांबली, उद्या (ता.16) रोजीही राष्ट्रीय बॅंका बंद राहणार आहेत.

जिल्ह्यात सुमारे 70 टक्कयांपर्यंत उलाढाल थांबल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगिले. संपाची सुरवात सकाळी सहापासून जेथे चेक क्‍लिअरिंगचे काम पाहतात तेथून झाली. मंगळवारी रात्री बारापर्यंत हे कामकाज बंद राहणार आहे. सर्व श्रेणीतील सुमारे सहा हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी झाल्यामुळे शंभर टक्के संप यशस्वी झाला.  दरम्यान आंदोलन, मेळावे, मोर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी परवानगी नाकारल्यामुळे केवळ प्रातिनिधी म्हणून लक्ष्मीपुरीतील बॅंक ऑफ इंडियाच्या दारात सकाळी मोजक्‍याच कर्मचारी अधिकाऱ्यांनी हातात फलक धरून मूक आंदोलन केले. 

यात बॅंक ऑफ इंडिया स्टेट युनियन पुणेचे सचिव विकास देसाई, सुहास शिंदे, रमेश कांबळे, प्रमोद शिंदे, चंद्रकांत गुडसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. शहरासह परिसरातील बॅंकाच्या दारातच आज-उद्या संप असल्याचे फलक लावले होते. तर काही ठिकाणी ग्राहकांना पहारेकरी संप असल्याचे सांगत होते.

युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनचे महाराष्ट्र राज्यचे निमंत्रक देवीदास तुळजापूरकर यांनी संप शंभर टक्के यशस्वी करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे या संपात ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉइज असोसिएशन, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बॅंक एम्प्लॉइज, ऑल इंडिया बॅंक ऑफिसर्स कॉनफेडरेशन, ऑल इंडिया बॅंक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बॅंक ऑफिसर्स कॉंग्रेस, इंडियन नॅशनल बॅंक एम्पलॉइज फेदरेशन, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बॅंक वर्कर्स, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बॅंक ऑफिसर्स आणि बॅंक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया या संघटना सहभागी होत आहेत. 

सहकारी बॅंकांच्या कामावर परिणाम  

राष्ट्रीयकृत बॅंका बंद असल्यामुळे इतर सहकारी बॅंकांच्या उलाढालीवर परिणाम झाला. तेथील कामकाज ही कमी झाले. अनेकांचे धनादेश क्‍लिअरिंगचे काम थांबले. पेन्शनसह जनधन योजना व इतर सरकारी खाती याच राष्ट्रीयकृत बॅंकात आहेत. त्यामुळे सरकारी कामावरही त्यांचा परिणाम झाला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area