कोल्हापूर : कबनूरात उसाचा ट्रॅक्टर पलटी; एकजण जागीच ठार
 इचलकरंजी (कोल्हापूर) : कबनूर (ता. हातकणंगले) येथे ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. प्रेमचंद अशोक काडाप्पा (वय 52, रा. कबनूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर दिलीप महादेव आवळे (वय 55) आणि उदय संभाजी इंगवले (वय 50, दोघे रा. कबनूर) अशी जखमींची नावे आहेत. हा अपघात कोल्हापूर रोडवरील ओढ्याजवळ पंचगंगा साखर कारखान्याकडे वळणाऱ्या बायपास मार्गावर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास झाला.  कबनूर येथे ओढ्याजवळ असलेल्या बायपास रोड वरून ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पंचगंगा साखर कारखान्याकडे चालला होता. वळणावरच ट्रॅक्टर पलटी होऊन ट्रॅक्टर खाली प्रेमचंद काडाप्पा, दिलीप आवळे व उदय इंगवले हे तिघे सापडले. नागरिकांनी आरडाओरडा केला तर काहींनी रुग्णवाहिकेला पाचारण केले. नागरिकांच्या मदतीने ऊसाखाली सापडलेल्या जखमींना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक बाबुराव महामुनी पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी भेट दिली.

जखमींना आयजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रेमचंद काडाप्पा यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. उर्वरित दोघांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यावेळी रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. या अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सुरू होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area