पत्नीच्या अंगावर अॅसिड फेकले, पतीला १० वर्षे सक्तमजुरी

 पत्नीच्या अंगावर अॅसिड फेकणाऱ्या पतीला न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अहमदनगरमधील आलमगीर येथे २०१७मध्ये ही घटना घडली होती.

नगर : 
दोघांचे पटत नसल्याने वेगळे राहणाऱ्या पत्नीच्या अंगावर अॅसिड फेकून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात पतीला दहा वर्षे सक्तमजुरी व पन्नास हजार रुपये दंड करण्यात आला. दंडाच्या रकमेतून चाळीस हजार रुपये त्या पीडित महिलेला देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.


नगर शहराजवळील आलमगीर येथे २०१७ मध्ये ही घटना घडली होती. यातील आरोपी श्रीकांत आनंदा मोरे (रा. प्रबुद्धनगर, आलमगीर, भिंगार) याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी ही शिक्षा सुनावली.


यातील फिर्यादी महिलेचे २००८ मध्ये आरोपी मोरे याच्याशी लग्न झाले होते. त्यांना दोन मुलेही आहेत. मात्र दोघांमध्ये सतत वाद होते. नेहमीच्या त्रासाला कंटाळून ती महिला पतीला सोडून आपल्या आईच्या घरी राहायला गेली. मुलेही तिच्यासोबत होती. तेथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तिने मुलांचे अॅडमिशन घेतले होते. ३ ऑगस्ट २०१७ रोजी ती एका शिक्षकासोबत मुलाला शाळेतून आणण्यासाठी निघाली होती. त्यावेळी रस्त्यातच आरोपी मोरे आडवा आला. त्याने दुचाकी थांबवून शिक्षकाला निघून जाण्यास सांगितले. त्यानंतर पत्नीसोबत काही अंतर बोलत पायी निघाला. थोडे पुढे जाताच खिशातून अॅसिडची बाटली काढून ते अॅसिड तिच्या अंगावर फेकले. अॅसिडमुळे ती होरपळली. त्यामुळे वेदना होत असताना ती काही काळ रस्त्यावरच पडून राहिली. जवळून जाणाऱ्या लोकांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी रुग्णवाहिका बोलावून तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला. तिने घडलेली ही हकीकत सांगून पतीविरूद्ध तक्रार दाखल केली. उपचारानंतर तिचा जीव वाचला मात्र, जखमा कायम राहिल्या.


पोलीस निरीक्षक एस. पी. कवडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी नगरच्या जिल्हा न्यायालयात झाली. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी बाजू मांडली. यामध्ये सहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शिक्षक, वैद्यकीय अधिकारी, तपासी अंमलदार, विशेष न्यायदंडाधिकारी व पंच यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.


न्या
यालयात युक्तिवाद करताना केळगंद्रे-शिंदे म्हणाल्या की, महिलांचा सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार कुणालाही हिरावून घेता येत नाही. अॅसिड हल्ल्यामुळे पीडितेचे शारिरीक व मानसिक खच्चीकरण होते. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना रोखल्या जाव्यात व समाजातील विकृत मानसिकतेमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी आरोपीला कडक शिक्षा होण्याची गरज आहे.

न्यायालयाने साक्षीपुरावा ग्राह्य धरून आरोपीला दोषी ठरविले आणि दहा वर्षे सक्तमजुरी व पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंडाच्या रक्कमेपैकी ४० हजार रूपये पीडित महिलेला नुकसान भरपाई म्हणून द्यायचे आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area