लग्नाच्या वरातीत ‘नागोबा’ विना मास्क नाचत होते, कारवाईची ‘नागीण’ डसली

 कोविड १९ नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी लग्नाच्या वरातीत नाचणाऱ्यांविरोधात आणि वरपित्यासह डीजे मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगरमधील चास गावात ही कारवाई करण्यात आली.

अहमदनगर:
रात्रीच्या वेळी कोण लक्ष देणार, असे समजून वरात निघाली होती. नागिणीचे गाणे लावून धुंद झालेले ‘नागोबा’ विनामास्क नाचत होते. पण शेवटी पोलीस पथक आलेच, आणि ‘कारवाईची नागीण’ डसली. पोलिसांनी वरपित्यासह डीजे चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. डीजे सिस्टीम जप्त करण्यात आली. नगर तालुक्यातील चास या गावात काल सायंकाळी ही कारवाई झाली.

करोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. विशेषत: लग्नात होणाऱ्या गर्दीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. सर्व नियम पाळून केवळ पन्नास व्यक्तींच्याच उपस्थितीत लग्नाला परवानगी आहे. असे असले तरी अनेक ठिकणी हा नियम मोडला जात असल्याचे आढळून येते. पोलिसांची नजर चुकवून वेळा बदलून धुमधडाक्यात लग्न उरकली जात असल्याचे आढळून येते. नगर-पुणे महामार्गावरील चास या गावात रात्री पावणे बारा वाजता ही वरात निघाली होती. तेथे लक्ष्मण नामदेव कार्ले (रा. चास) यांच्या मुलाचे लग्न होते. त्यांच्या घरासमोरच कार्यक्रम ठेवला होता. त्यासाठी मंगेश अरुण थोरात (रा. पाइपलाइन रोड, नगर) यांचा डीजे बोलाविण्यात आला होता. डीजेच्या दणदणाटात वरात काढण्यात आली.

वरातीसमोर विना मास्क वऱ्हाडी नाचत होते. करोनासंबंधीचे सर्वच नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या वरातीची माहिती मिळाल्यानंतर नगर तालुका पोलिसांच्या पथकाने तेथे जाऊन कारवाई केली. चास ते अकोळनेर या अंतर्गत रस्त्यावर ही वरात सुरू होती. पोलिसांनी ती थांबविली आणि वरपिता कार्ले आणि डिजेचालक थोरात यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एरवी दंड करून लोक ऐकत नाहीत, हे लक्षात आल्याने आता पोलिसांनी स्वत: फिर्याद देऊन गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. वरातीत लावण्यात आलेल्या डीजेची सुमारे चार लाख १० हजार रुपयांची सामुग्री पोलिसांनी जप्त केली. अपत्ती निवारण कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांची नजर चुकवून सुरू असलेल्या या वरातीत शेवटी पोलिस आले आणि कारवाई केली. त्यामुळे संयोजकांसह वरातीत नाचणाऱ्यांनाही चांगलाच झटका बसला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area