एअर फोर्सचं मिग-२१ बायसन फायटर विमान कोसळलं, ग्रुप कॅप्टनचा मृत्यू

 अपघाताची कारणे शोधून काढण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेशइंडियन एअर फोर्सचे मिग-२१ बायसन विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. उत्तर भारतातील एका विमानतळावरुन सरावासाठी उड्डाण करताना मिग-२१ बायसन विमान कोसळले. या दुर्घटनेत एका ग्रुप कॅप्टनचा मृत्यू झाला आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

IAF ने या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. ग्रुप कॅप्टन ए.गुप्ता यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या कठिण काळात कुटुंबीयांच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहोत, असे एअर फोर्सने म्हटले आहे. अपघाताची कारणे शोधून काढण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश देण्यात आला आहे. 

यापूर्वी पाच जानेवारीला राजस्थानच्या सूरतगडमध्ये इंडियन एअर फोर्सचे मिग-२१ विमान कोसळले होते. तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळले होते. सुदैवाने या अपघातात वैमानिकाचे प्राण बचावले. 


कसं आहे मिग-२१ बायसन विमान?

1960 च्या दशकात मिग-२१ बायसन विमानाचा हवाई दलात समावेश झाला. मिकोयान-गुरेबिच यांनी या फायटर विमानाची डिझाइन केले होते. एक इंजिन आणि एक सीट असलेले हे विमान होते. आता मिग-२१ फायटर विमानांची भारतीय हवाई दलातून निवृत्तीची प्रक्रिया सुरु आहे. टप्प्याटप्प्याने ही विमाने सेवेतून निवृत्त होत आहेत. मिग-२१ बायसन विमाने भारतीय हवाई दलाचा कणा म्हणून ओळखली जायची. आता मिग-२१ बायसनची जागा स्वदेशी बनावटीचे तेजस विमान घेणार आहे. मिग-२१ बायसन प्रतितास २२३० किलोमीटर वेगाने उड्डाण करते. या फायटर जेटमधून चार आर-६० मिसाइल डागता येऊ शकतात. 
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area