पुण्यात खोदकामात सापडली 1835 च्या काळातील सोन्याची नाणी; 216 नाण्यांनी उजळली साताऱ्याची तिजोरी 

सातारा : पुण्याच्या पिंपरी चिंचवड परिसरातील चिखली येथे सहा महिन्यांपूर्वी घराचा पाया खोदताना सापडलेल्या सोन्याच्या 216 नाण्यांवर मजुरांनी डल्ला मारला होता. वाटणीच्या वादातून सुरु झालेली सोन्याच्या नाण्यांची कुजबुज कानावर आल्यानंतर ती नाणी पोलिसांनी जप्त केली. ही जप्त नाणी सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या खजिन्यात जमा झाली असून त्याच्या लखलखाटामुळे सर्वांचे डोळे विस्फारत आहेत.  चिखली परिसरात सहा महिन्यांपूर्वी घराच्या बांधकामासाठी पाया खोदण्याचे काम सुरु होते. जेसीबीने खोदकाम सुरु असतानाच जमिनीतून खळखळ आवाज आला. आवाजामुळे खोदकाम करणाऱ्या मजुरांचे कान टवकारले गेले. इतरांच्या नजरा चुकवत दोन मजुरांनी आवाजाच्या ठिकाणी शोध घेतला. यावेळी त्यांना तांब्याच्या धातूचा मोठा गडवा सापडला. जेसीबीचा दात लागून फुटलेल्या तांब्याच्या गडव्यात सोन्याची नाणी होती. आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून त्या दोघांनी सोन्याच्या नाण्यांचा गडवा लांबवला. 

यात सोन्याची तब्बल 216 नाणी होती. सहा महिन्यानंतर त्या दोघांच्यात वाटणीचा वाद झाला. या वादाची कुजबुज कानावर पडल्याने पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेत सोन्याची 216 ऐतिहासिक नाणी जप्त केली. ही नाणी पुणे येथील पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली. पडताळणीनंतर ती येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाच्या खजिन्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार ती नाणी नुकतीच पुरातत्व संचालक तेजस गर्गे,सहाय्यक संचाक विपीन वाहने यांनी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी गणेश पवार, अजीत पवार, विनोद मतकर, कुमार पवार, भांबळ आदी उपस्थित होते. 

खोदकामादरम्यान सापडलेली नाणी पोलिसांनी जप्त केली असून त्याचे वजन सुमारे 2 किलो 357 ग्रॅम इतके आहे. या सोन्याची किंमत बाजारभावानुसार दिड कोटीच्या घरात आहे. ही नाणी सुमारे सन 1835 ते 1889 या कालावधीतील सिराज उद्दीन महमंद शहा बहाद्दुर दुसरा याच्या राजवटीतील असण्याचा अंदाज आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area