जनावरांसाठीचा आहार विद्यार्थ्यांना; हडपसरमधील शाळेतील धक्कादायक प्रकार

 हडपसर- जनावरांना देण्यात येणारा निकृष्ट दर्जाचा हरभरा व तुरडाळ चक्क शालेय पोषण आहार योजने अंतर्गत महापालिकेच्या शाळेतील विदयार्थ्यांसाठी पुरवठा केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तसेच पुरवठा करण्यात येत असलेल्या प्रत्येक गोणीमध्ये ५ किलो कडधान्य कमी असल्याचे निषपन्न आले. त्यामुळे या योजनेत मोठा भ्रष्टाचार होत असल्याची बाब निदर्शनास आली. ही घटना हडपसर येथील महापालिकेच्या शाळा क्र. ५८ ( मुलींची ) येथे घडली. जागृत नागरिकांनी व लोकप्रतिनिधींच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. मुंबई येथील दि महाराष्ट्र स्टेट को- आॅप. कन्झुमर्स फेडरेशन लिमिटेड यांच्याकडून या कडधान्याचा पुरवठा करण्यात आला आहे.  हरभ-याच्या आणि तुरडाळीच्या गोणीवर जनावरांचा फोटो असलेला व जनावरांसाठी हे कडधान्य असल्याचा उल्लेख आहे. तसेच आतील कडधान्य देखील निकृष्ट दर्जाचे आहे. या शाळेत हरभ-याच्या ३० तर तुरडाळीची २९ गोण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते राजेश गायकवाड व माजी महापौर वैशाली बनकर यांच्या हस्तक्षेपानंतर कडधान्य घेउन आलेला टेंम्पो परत पाठविण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते गायकवाड म्हणाले, 'धान्याचे वाटप करणा-या वाहनाच्या दर्शनी भागावर शालेय पोषण आहार योजने अंतर्गत धान्याचा पुरवठा असा फलक लावलेला नाही. नियमानुसार कर्मचा-याकडे ओळखपत्र नाही. पुरवठा करणा-या वाहनात इलेक्ट्रॅानिक वजन काटा नाही. या योजने अंतर्गत पुरविण्यात येणा-या धान्याच्या गोणीवर महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शालेय पोषण आहार योजने अंतर्गत धान्यादी वस्तूंचे वितरण, विक्रीसाठी नाही, पुरवठा दाराचे नाव, किलोग्राम निव्वळ वजन याचा उल्लेख बंधनकारक असताना गोणीवर याबाबतचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे या योजनेत मोठा भ्रष्टाचार आहे. सर्व नियम डावलून या शाळेत कडधान्य वाटप करण्यात येत आहे. हे चुकीचे आहे.' 

दि महाराष्ट्र स्टेट को- आॅप. कन्झुमर्स फेडरेशन लिमिटेडचे पुणे विभागीय अधिकारी अनिल सुरशे म्हणाले, जनावरांसाठीचे धान्य चुकुन टेम्पोत टाकण्यात आले असावे. याबाबत माहिती घेउन सांगतो. याबाबत महापालिकेच्या शिक्षण प्रमुख मिनाक्षी राउत म्हणाल्या, जनावरांसाठीचे कडधान्य विद्यार्थ्यांसाठी पुरवठा केल्याची बाब धक्कादायक आहे. याबाबत राज्यशासनाकडे तक्रार केली जाईल व पुरवठा करणा-या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली जाईल. 

माजी महापौर वैशाली बनकर म्हणाल्या, जनावरांसाठीचा आहार गरीब विदयार्थ्यांना पाठविण्यात आला आहे. सदर कडधान्य निकृष्ठ दर्जाचे आहे. याबाबत सर्वसाधारण सभेत हा विषय घेणार असून दि महाराष्ट्र स्टेट को- आॅप. कन्झुमर्स फेडरेशन लिमिटेड यांच्याकडून पूर्ण शहरात शालेय पोषण आहार योजने अंतर्गत कडधान्याचे वाटप करण्यात येत आहे. ते बंद करून संबधीत पुरवठादारावर कारवाई झालीच पाहिजे यासाठी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्याकडे मागणी करणार आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area