Chandrakant Patil: आज एका मंत्र्याची विकेट पडू शकते!; चंद्रकांत पाटलांनी केला 'हा' मोठा दावा

 Chandrakant Patil: सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आजच एका मंत्र्याची विकेट पडू शकते, असे भाकीत केले आहे.
कोल्हापूर: 
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचा आज राजीनामा होणार असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात केला. गेल्या दोन-तीन दिवसापासून सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे प्रकरणावरून पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय वादळ उठले आहे, या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतही धुसफूस सुरू झाली असून त्याकडे बोट दाखवत पाटील यांनी हा दावा केला. ( Chandrakant Patil On Sachin Vaze Arrest )

कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, एकाच वेळी राज्यातील अनेक मंत्री दिल्लीला गेले आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे दिल्लीत आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेही दिल्लीला गेले आहेत. आणखी काही नेते दिल्लीत पोहोचल्याची चर्चा आहे. या सर्व घडामोडी पाहता एका मंत्र्याचा राजीनामा आज होण्याची शक्यता आहे. हे गृहमंत्री अनिल देशमुख तर नाहीत ना ? असा सवाल पत्रकारांनी विचारला असता ‘ते मला माहित नाही, पण आज एका मंत्र्यांची विकेट पडणार एवढेच मी सांगू शकतो’ असे ते म्हणाले. वर्षभरात एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागतो, दुसऱ्याचा राजीनामा चर्चेत येतो आणि तिसऱ्याचा राजीनामा लवकरच होण्याची शक्यता आहे. यावरून या सरकारमध्ये काहीही आलबेल नाही, हेच स्पष्ट होते, असे पाटील यांनी सांगितले.

‘महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे याचा पुरावा हवा असेल तर अविश्वास ठराव आणा’ असे आव्हान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपला दिले होते. याबाबत विचारले असता प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, विधानसभा सभापतीची निवडणूक घेतली असती तर तुमच्याकडे बहुमत नाही हेच सिद्ध झाले असते. बहुमत सिद्ध करण्याची भीती वाटल्यामुळे ही निवड सरकारने पुढे ढकलली असा टोलाही त्यांनी मारला. राज्यपालांनी सांगूनही ही निवडणुक टाळली, राज्यपालांचा अवमान केला असा आरोप करून ते म्हणाले, अविश्वास ठराव कधी दाखल करायचा हे आम्हाला कळते. वेळ आल्यावर तेही करू असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यकर्त्यांचा एवढा अपमान करणारे राज्यपाल इतिहासात कधी पाहिले नाहीत अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली होती. याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, एखाद्या राज्यपालांचा राज्यकर्त्याकडून एवढा अपमान होतो हे इतिहासात कधीच घडले नाही. राज्यकर्ते राज्यपालांचा किती अपमान करतात याचा पुरावा सध्या महाराष्ट्रात मिळत आहे. विमानातून उतरले जाते, त्यांनी बैठक बोलाविल्यास तिकडे मंत्री जात नाहीत. हा त्यांचा अपमान नाही का असा सवालही त्यांनी केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area