कॅनडामध्ये लावण्यात आलेले मोदींचे होर्डिंग एका दिवसात हटवले; जाणून घ्या कारण

 


टोरंटो- भारताने कोरोनावरील लसीचा पुरवठा कॅनाडाला केला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देण्यासाठी तेथील भारतीय वंशाच्या समुदायाने मोदींचे फोटो असणारे होर्डिंग लावले होते. पण, एका दिवसातच हे होर्डिंग्ज हटवण्यात आले आहेत. 

'हिंदुस्तान लाईव्ह'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. भारत अनेक देशांना कोरोना लशीचा पुरवठा करत आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या विनंतीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख लशीचे डोस कॅनडात पाठवले होते. यासंदर्भात ट्रुडो यांनी मोदींचे आभार मानले होते. त्यानंतर कॅनडातील भारतीय समुदायाने ग्रेटर टोरंटोमध्ये होर्डिंग लावून मोदींचे आभार मानले होते. पण, या होर्डिंगसंबंधी स्थानिकांकडून तक्रारी येत असल्याने हे होर्डिंग एकाच दिवसात वापस घेण्यात आले आहेत.  

कॅनडातील भारतीय समुदायाने ग्रेटर टोरंटोमध्ये 9 होर्डिंग लावले होते. यासाठी त्यांनी एका जाहीरात कंपनीशी करार केला होता. पण, मोदींचा फोटो असल्याने स्थानिकांकडून अनेक तक्रारी येत होत्या. होर्डिंग्जमध्ये पंतप्रधान मोदींना धन्यवाद देण्यात आले होते. तसेच कॅनडा आणि भारताच्या मैत्रीचा उल्लेख करण्यात आला होता. हे होर्डिंग पाच आठवडे ठेवण्याचा करार झाला होता. पण, गुरुवारी मोदींचे होर्डिंग लावणाऱ्या हिंन्दू फोरम कॅनाडाला आऊटफ्रंट मीडियाने एक मेल पाठवला आहे. स्थानिकांनी केलेल्या तक्रारीनंतर हे होर्डिंग हटवण्यात आले, असं मेलमध्ये सांगण्यात आलंय.

कॅनडामध्ये लावण्यात आलेल्या होर्डिंगवर पंतप्रधान मोदींच्या फोटोसोबत लिहण्यात आलं होतं की, कॅनडाला कोविड लस देण्यासाठी पंतप्रधान मोदींचे आभार. भारताकडून कॅनडाला लसीचे 20 लाख खुराक दिले जाणार आहेत. यासाठी कॅनडाने भारताचे आभार मानले आहेत. अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महिन्याच्या सुरवातीला जस्टीन ट्रुडो यांच्यासोबत बातचित केली होती. या दरम्यान त्यांनी ट्रुडो यांना आश्वासन दिलं होतं की, भारत कॅनडाच्या कोरोना लसीकरणाच्या प्रयत्नांमध्ये मदत करेल. तर ट्रुडो यांनी याला प्रत्युत्तर देताना म्हटलं होतं की, जर जगात कोरोना विरोधातील लढा यशस्वी झाला तर तो भारताच्या औषध निर्मितीच्या क्षमतेमुळेच होईल. 

दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसचा हाहाकार अद्यापही सुरुच आहे. गेल्या वर्षी याच काळात कोरोनाने जगभरात थैमान घालायला सुरुवात केली होती. मात्र, आता एका वर्षानंतर जगभरात कोरोनाची लस उपलब्ध झाली आहे. भारतानेही दोन लसींना मान्यता दिली असून जगातील सर्वांत मोठ्या लसीकरणाची मोहीम सध्या भारतात सुरु आहे. भारताने इतर देशांना देखील लसीचा पुरवठा केलाय. भारताने नेपाळ, अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि कॅनडापर्यंत अनेक देशांना कोरोना लसीचा पुरवठा करुन जगभरात आपल्या मानवतेचं दर्शन घडवलं. 

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area