सकाळी दहाच्या सुमारास काही शेतकरी गवताची कापणी करीत असताना त्यांना गवा ऊस शेतीत जाताना दिसला.
घुणकी (कोल्हापूर) : हातकणंगले तालुक्यातील किणी, घुणकी येथे ग्रामदैवताच्या यात्रेदिवशीच गव्याने दर्शन दिल्याने किणी, घुणकी, चावरे, तळसंदे या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. किणी येथील हनुमान आणि घुणकी येथील मंगोबा यात्रा सुरु आहेत.
किणी येथील विचारे मळ्यातील सत्यजीत पाटील हे सकाळी आठच्या सुमारास शेतात गेले होते. पाणंद रस्त्याने गवा येताना त्यांनी व्हिडीओ शुट केला. दरम्यान त्यांनी जनावरांच्या शेडमध्ये जाऊन गव्याला त्यांनी हुसकावून लावले. त्यामुळे तो घुणकीच्या दिशेन गेला. त्यानंतर पुणे-बंगळूर महामार्गावरील ओढ्याच्या पुलाखालून घुणकीच्या उत्तरेकडील बाजूला दीड किलोमीटरवर असलेल्या ढाग रस्त्यावरील कोंडार भागात घुसला. सकाळी दहाच्या सुमारास काही शेतकरी गवताची कापणी करीत असताना गवा दिसला.
अकराच्या सुमारास मंगोबा मंदिराच्या मागील बाजूस मोहिते रस्त्यावरील रामचंद्र मोहिते यांच्या उसाच्या शेतात तो गेला. अशी माहिती मिळताच युवकांसह लोकांनी तिकडे गर्दी केली. तिथुन गव्याला हुसकावून लावल्याने तो चावरे गावच्या दिशेने गेला. या परिसरात मंगोबा देवाच्या दर्शनासाठी भाविक येत असून यात्रेतच गव्याचे दर्शन झाल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या घटनेची खबर वनविभागाला कळविली असून कर्मचारी गव्याचा अंदाज घेत आहेत.
हे गवे चाऱ्यासाठी भटकतात. ते भित्रे आहेत. मात्र समोर आल्यास संरक्षणासाठी धावून येतात आणि पळ काढतात. युवकांनी गव्यांच्या मागे लागू नये. ते बिथरण्याची शक्यता असते. गवे एका ठिकाणी थांबत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात जाताना दक्षता घ्यावी असे आवाहन वनविभागाने केले आहे.