पुणे जिल्‍हा परिषदेचे शैक्षणिक गुणवत्‍ता वाढीसाठी उपक्रम

 


आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक असतो. तो संस्‍कारक्षम व जबाबदार नागरिक व्‍हावा, यासाठी शालेय जीवनातच त्‍याला योग्‍य वळण मिळणे गरजेचे असते. हे लक्षात घेऊनच पुणे जिल्‍हा परिषदेच्‍यावतीने गुणवंत विद्यार्थी घडविण्‍यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.

उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्ष निर्मला पानसरे, उपाध्‍यक्ष रणजीत शिवतरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि शिक्षण विभाग शैक्षणिक गुणवत्‍ता वाढीसाठी उपक्रम राबवत आहेत.

पुणे जिल्‍ह्यात जिल्‍हा परिषदेच्‍या एकूण शाळा 3 हजार 648 असून एकूण शिक्षक संख्या 11 हजार 574 आहे. पट संख्या 2 लक्ष 28 हजार 687 आहे. डिजिटल शाळा 2 हजार 782 तर एलसीडी प्रोजेक्टर असलेल्या शाळा 1 हजार 389 व इंटरनेट असलेल्या शाळा 842 आहेत. संगणक उपलब्ध असलेल्या शाळांची संख्‍या 2 हजार 443 इतकी आहे.

शैक्षणिक गुणवत्‍तावाढीसाठी तज्ञ व यशस्‍वी शिक्षकांकडून सर्व केंद्र प्रमुख व शिक्षकांना मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्‍यांच्‍या सराव परीक्षा घेतल्‍या जात असल्‍याने प्रत्‍येक वर्षी निकालामध्‍ये व शिष्‍यवृत्‍तीधारक विद्यार्थ्‍यांमध्‍ये वाढ होत आहे. सन 2018-19 मध्‍ये इयत्‍ता पाचवीचे 545 विद्यार्थी शिष्‍यवृत्‍तीधारक होते. सन 2019-2020 मध्‍ये ही संख्‍या 574 झाली. सन 2018-19 मध्‍ये इयत्‍ता आठवीचे 36 विद्यार्थी शिष्‍यवृत्‍तीधारक होते. सन 2019-2020 मध्‍ये ही संख्‍या 58 झाली.

 विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविले जाणारे उपक्रम

 विद्यार्थ्यांना शालेय गणवेश- शासनाद्वारे जिल्हा परिषद शाळेतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्य रेषेखालील मुले व सर्व मुलींना मोफत गणवेशासाठी अनुदान दिले जाते. परंतू उर्वरित विद्यार्थ्यांना गणवेशासाठी शासनाकडून अनुदान मिळत नाही. त्यांची कुचंबना होवू नये म्हणून अशा एकूण 79 हजार 403 विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद निधीतून सन 2020-2021 मध्ये गणवेशासाठी अनुदान देण्यात येणार आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेची पुस्तके व परीक्षा फी- जिल्हा परिषद शाळांच्या इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी च्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षांना बसविले जाते व त्यांची परीक्षा फी जिल्हा परिषद निधीतून भरली जाते. या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी काही विद्यार्थी पुस्तके विकत घेवू शकत नाही, असे निदर्शनास आल्यामुळे यावर्षी सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची बालभारतीने छापलेली पुस्तके जिल्हा परिषद निधीतून खरेदी करुन मोफत वाटप करण्यात येणार आहे.

प्रज्ञाशोध परीक्षा – शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी एक वर्ष अगोदरपासूनच व्हावी यासाठी इयत्ता 4 थी व इयत्ता 7 वी साठी जिल्हास्तरावरुन प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित शिक्षकांकडून अभ्यासक्रम तयार करुन घेतला आहे व त्याप्रमाणे जिल्हा परिषद निधीतून पुस्तके छापून घेवून सर्व विद्यार्थ्यांना मोफत वाटण्यात येणार आहे.

सामान्य ज्ञान परीक्षा- विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची सवय लागावी, सामान्‍यज्ञान वाचण्याची व लक्षात ठेवण्याची सवय लागावी तसेच पाठ्यपुस्तकाबरोबरच अवांतर वाचनाची सवय लागावी म्हणून उच्च प्राथमिकच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावरुन सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी तज्ञ शिक्षकांकडून अभ्यासक्रम तयार करुन घेतला आहे. त्याप्रमाणे जिल्हा परिषद निधीतून पुस्तके छापून घेवून सर्व विद्यार्थ्यांना मोफत वाटण्यात येणार आहे.

हस्ताक्षर सुधार कार्यक्रम

जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेषत: इयत्‍ता 2 री ते 4 थी च्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम राबविण्यात येतो.

अध्ययनस्तर निश्चिती- शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला जुलै महिन्यात व शेवटी मार्च महिन्यात सर्व विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर निश्चिती करण्यात येते.

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबविले जाणारे उपक्रम -गंमत –जंमत उपक्रम – इयत्ता 1 लीच्या विद्यार्थ्यांसाठी गंमत- जंमत हा उपक्रम राबविला जातो. त्यासाठी संबंधित शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.

स्टेप (STEP) उपक्रम

इयत्ता 1 ली  व इयत्ता 2 री च्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविला जातो. यामध्ये संपूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम दोन-दोन महिन्यांमध्ये विभागून अध्ययन निष्पत्तीनुसार निश्चित केलेल्या कौशल्यानुसार अध्यापनासाठीचा आराखडा तयार केला जातो. त्यानुसार अध्यापन केले जाते. दोन महिन्याच्या शेवटी किंवा तिसऱ्या महिन्याच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांचे मुल्यांकन केले जाते. ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित कौशल्य प्राप्त झाले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी जादा तासाचे आयोजन केले जाते.

ज्ञानरचनावादी उपक्रम

हा उपक्रम पुणे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये राबविला जातो. यामध्ये सर्व विषयांच्या सर्व घटकांचे शैक्षणिक साहित्य तयार केले जाते. त्यानुसार अध्यापन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घटक समजण्यास मदत होते. हे शैक्षणिक साहित्य वापरुन विद्यार्थी स्वयं अध्ययन करतात.

100 टक्के प्रगत असणाऱ्या शाळांना भेटी

ज्या शाळा 100 टक्के प्रगत आहेत अशा शाळांना उर्वरित शाळांच्या भेटी केल्या जातात. त्यामुळे त्या शाळेमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबविल्‍या जाणाऱ्या उपक्रमाविषयी माहिती मिळते व प्रेरणा मिळते.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शन

केंद्रातील सर्व शाळेतील/शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व शाळेच्या भौतिक सुविधांचा विकास करण्‍यासाठी केंद्रप्रमुखांना त्यांच्या कर्तव्याची व जबाबदारीची जाणीव करुन देण्यासाठी तसेच त्यांना त्यांच्या कामासाठी प्रेरणा देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तालुक्यांच्या कार्यशाळा घेऊन सर्व केंद्रप्रमुखांना मार्गदर्शन केलेले आहे. तज्ञ व नवोपक्रमशील शिक्षकांद्वारे इतर शिक्षकांना मार्गदर्शन, प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी केंद्र परिषदा आणि पर्यवेक्षीय यंत्रणांच्या जास्तीत जास्त शाळा भेटी व मार्गदर्शन या माध्‍यमातून गुणवत्‍तावाढीसाठी प्रयत्‍न केले जात आहेत.

 आदर्श शाळा

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी व सर्वांगीण विकासासाठी शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार प्रत्येक तालुक्यातून एका शाळेची निवड करण्‍यात आली आहे. तालुकानिहाय आदर्श शाळेसाठी निवड केलेल्या शाळा पुढीलप्रमाणे आहेत. जिल्हा परिषद शाळा,  थोरांदळे (आंबेगाव), जिल्हा परिषद शाळा, सांगवी (बारामती), जिल्हा परिषद शाळा, उत्रोली (भोर), जिल्हा परिषद शाळा, खडकी (दौंड), जिल्हा परिषद शाळा, डोणजे (हवेली), जिल्हा परिषद शाळा, सणसर (जुन्नर), जिल्हा परिषद शाळा, आंबेठाण (खेड), जिल्हा परिषद शाळा, कान्हे (मावळ), जिल्हा परिषद शाळा, सुतारवाडी (मुळशी),जिल्हा परिषद शाळा, सुपे खुर्द (पुरंदर), जिल्हा परिषद शाळा, मुंजाळवाडी (शिरुर) आणि जिल्हा परिषद शाळा, वेल्हे बुद्रूक (वेल्हा).

केंद्रातून एक आदर्श शाळा तयार करणे -शासनाच्या आदर्श शाळा संकल्पनेतून पुणे जिल्हा परिषदेंतर्गत 305 केंद्रातील प्रत्येक केंद्रातून एका शाळेची निवड करुन या शाळेस आदर्श शाळा तयार करण्यात येणार आहे. या शाळेच्या विकासासाठी लोकसहभाग, सीएसआर व जिल्‍हा परिषद निधीमधून उपलब्ध होणाऱ्या निधीचा वापर करण्यात येणार आहे. शाळा निवडीचे निकष हे शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे आहेत.

आदर्श शाळेचे निकष – (भौतिक सुविधा)

शाळेचे स्थान मध्यवर्ती असावे. शाळासिद्धी व स्वच्छ शाळा प्रमाणे भौतिक सुविधा असाव्यात. वाढती पटसंख्या व पुरेशा जागेची उपलब्धता असावी. संरक्षक भिंत असावी. अध्ययनपूरक व पर्यावरण पूरक वातावरण असावे. विद्युतीकरण सुविधा असाव्यात. पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षक असावेत. आपत्ती व्यवस्थापनाबाबत यंत्रणा अद्ययावत असावी. इमारत चाईल्ड फ्रेंडली व इकोफ्रेंडली असावी. शाळेत वायफाय यंत्रणा/ इंटरनेट असावे. सोलर युनिट असणे अपेक्षित आहे. शालेय इमारतीत हवा खेळती असावी. क्रीडांगण सुविधा असावी. विज्ञान प्रयोगशाळा असावी. प्रथमोपचार पेटी असावी. रेनवॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था असावी. शाळेला सभागृह असावे. विद्यार्थ्यांसाठी असणारी वाहतूक व्यवस्था सुरक्षित असावी.

शालेय वातावरण

विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्याचा विकास करण्यास पूरक असावे. पुरेसे शैक्षणिक साहित्य असावे. अभ्यासपूरक कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी व्हावी. विद्यार्थ्यांच्‍या अंगभूत व व्‍यावसायिक क्षमतेप्रमाणे विकासास अनुरूप कार्यक्रमाचे आयोजन करणे अपेक्षित आहे. भविष्यकाळातील व्यावसायिक मागणीचा अंदाज बांधून त्याबाबतचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करणे अपेक्षित आहे. आरोग्य व स्वच्छता तसेच सुरक्षेबाबत नियमावली व यंत्रणा असणे आवश्यक आहे.

शालेय विकास आराखडा

शाळेच्या गरजा निश्चितीसाठी शाळेच्‍या शालेय व्यवस्थापन समितीने शाळा विकास आराखडा तयार करणे अपेक्षित आहे. शाळेच्या विकास आराखड्याच्या दृष्टिकोनातून शाळेने लोकसहभागातून निधी जमवून तसेच शासन निधी उपलब्ध करुन घेवून विकास करणे अपेक्षित आहे.

शैक्षणिक गुणवत्ता

प्रत्येक विद्यार्थ्याने विषयनिहाय किमान संपादणूक पातळी प्राप्त करणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांच्या संपादणुकीचा स्तर निश्चित करुन तो उंचावणे अपेक्षित आहे. इयत्ता 1 ली ते इयत्ता 3 री च्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेच्या पातळीच्या मुल्यांकनात किमान 75 टक्के गुण मिळविणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित होण्यासाठी शालेयस्तरावर कार्यशाळा आयोजित करणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकास देशांतर्गत व देशाबाहेरील शाळांना भेटी देण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येईल. शाळेची पट संख्या सातत्याने वाढणे अपेक्षित आहे.

शिक्षकांची कामगिरी

शिक्षकांनी शिक्षणातील नवीन विचारप्रवाहानुसार स्वत:ला अद्ययावत ठेवणे अपेक्षित आहे. शिक्षकांना व्यावसायिक बांधिलकीची जाण असणे अपेक्षित आहेत. ‍शिक्षकांनी किमान सलग पाच वर्षे संबंधित शाळेत अध्यापन करणे अनिवार्य असेल.

शालेय नेतृत्व व व्यवस्थापन

शाळेच्या मुख्याध्यापकाला शालेय नेतृत्व व व्यवस्थापन याचे प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे. मुख्याध्यापकांनी शाळेची एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यसंस्कृती निर्माण करावी.

 आम्ही इंग्रजी शिकतो

विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे ज्ञान होण्यासाठी तसेच त्‍यांना इंग्रजी भाषेमध्‍ये बोलता येण्यासाठी शालेयस्तरावर विविध कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले आहेत. विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान होण्यासाठी मागील काही वर्षामध्ये आकाशवाणीद्वारे We Learn English हा कार्यक्रम पुणे जिल्ह्यात शिक्षण विभागाद्वारे प्रसारीत करण्यात येत होता. या कार्यक्रमाचे 15-15 मिनिटांचे 84 पाठ आहेत. दररोज 15 मिनिटाप्रमाणे 84 दिवसात पूर्ण होतो. या आकाशवाणीवरुन प्रसारीत करावयाच्या कार्यक्रमासाठी सेंटर फॉर लर्नींग रिसोर्सेस (सीएलआर) ह्या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला अभ्यासक्रम नि:शुल्क मिळाला आहे.

या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचे इंग्लिश भाषा कौशल्य विकसित होणार आहे. तसेच श्रवण- संभाषण, कौशल्य विकसित होण्‍यासाठी मदत होणार आहे. या कार्यक्रमापासून शिक्षकांना पण त्यांचे इंग्लिश भाषा कौशल्य सुधारण्यासाठी मदत होईल.  हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या मिडीयम व्हेव 792 KHZ वरुन 19 जानेवारी 2021 पासून सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 10.30 ते 11 दरम्यान प्रसारीत करण्यात येत असून 26 मार्च 2021 पर्यंत प्रसारीत करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area