मुंबई महापालिकेनं पुन्हा एकदा एका रेस्टॉरंट अँड बारवर धडक कारवाई केली आहे. "डी" विभाग कार्यालयातर्फे काल रात्री एकच्या सुमारास या हॉटेलवर महापालिकेच्या पथकाने धाड टाकली.
मुंबई:
मुंबई महापालिकेनं पुन्हा एकदा एका रेस्टॉरंट अँड बारवर धडक कारवाई केली आहे. ब्रिच कॅन्डी रुग्णालयाजवळील 'अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार' वर महापालिकेनं कारवाई केल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई महापालिकेच्या "डी" विभाग कार्यालयातर्फे काल रात्री एकच्या सुमारास या हॉटेलवर महापालिकेच्या पथकाने धाड टाकली. या धाडीत पालिकेनं २४५ लोकांवर गुन्हा नोंदवला आहे.
पालिकेनं विना मास्क विषयक कारवाईसह सामाजिक अंतर न राखणे आणि सरकारच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा नोंदवलेला आहे. तसेच हे 'रेस्टॉरन्ट आणि बार' महापालिकेने बंद केलं आहे. तसेच रात्री २४५ लोकांवरती विना मास्क आढळल्यामुळे १९ हजार ४०० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीही जुहूतील पबवर मुंबई पालिकेनं कारवाईचा बडगा उगारला होता. अंधेरीच्या के वार्डानं ही कारवाई केली होती. या कारवाईत पालिका अधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केल्याचं समजलं होतं.
जुहूतील प्रसिद्ध क्लब R ADDA आणि पब 'बैरल मेंशन' यांच्यावर हा कारवाईचा बडगा उगारला. मध्यरात्री २ वाजेपर्यंत पबमध्ये तरुणांची मोठ्या संख्येने गर्दी होती. अगोदरपासून पब आणि हॉटेल यांनी नियम पाळले नाही तर त्यांच्यावर कारवाई होत आहे.