एरव्ही लोकांचं तोंड गोड करणाऱ्या या कंपनीचं तोंड मात्र आता कडू झालं आहे.
नवी दिल्ली :
डेअरी मिल्क अनेकांचं आवडतं चॉकलेट असेल. एरव्ही लोकांचं तोंड गोड करणाऱ्या या कंपनीचं तोंड मात्र आता कडू झालं आहे. CBI ने या चॉकलेट बनवणाऱ्या कंपनीवर धाड टाकली आहे. तसेच त्यांच्याविरोधात 240 कोटींच्या फ्रॉडचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅडबरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड 2010 पासून पूर्णपणे अमेरिकन स्नॅक्स कंपनी मॉन्डलीजची आहे. CBI च्या म्हणण्यानुसार, कॅडबरीने भ्रष्टाचार केला आहे. कंपनीने क्षेत्रनिहाय मिळणाऱ्या टॅक्समधील सवलतींचा गैरवापर केला आहे तसेच टॅक्सची चोरी केल्याचा आरोप आहे.
न्यूज एजन्सी IANS च्या माहितीनुसार, CBI ने सोलन, बद्दी, पिंजोर आणि मुंबईच्या दहा ठिकाणी छापेमारीची कारवाई केली आहे. कंपनीने सेंट्रल एक्साइजच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून सरकारला टॅक्सच्या रुपात 241 कोटींचा चुना लावला आहे. आर्थिक अनियमिततेचं हे प्रकरण 2009-11 च्या दरम्यानचं असल्याचं सांगण्यात येतंय. प्राथमिक तपासानंतर CBI ने FIR दाखल केली आहे. आपल्या FIR मध्ये CBI ने कंपनीवर अनेक प्रकारचे आरोप लावले आहेत.
हिमाचल प्रदेशातील कॅडबरी चॉकलेटच्या फॅक्टरीसाठी परवाना मिळविण्याबाबत आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचाराचा ठपका ठेवत कॅडबरी इंडिया लिमिटेड (आता मॉन्डलीज फूड्स प्रायव्हेट लिमिटेड) आणि केंद्रीय उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांवर IPC 20 (बनावट) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
12 जणांना अटक
या प्रकरणी CBI ने 12 लोकांना अटक केली आहे. यामध्ये सेंट्रल एक्साइज डिपार्टमेंटचे दोन अधिकारी देखील सामील आहेत. त्यांच्याशिवाय कॅडबरी इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट विक्रम अरोरा आणि डायरेक्टर राजेश गर्ग आणि जेलबॉय फिलीप्स यांना देखील अटक केली आहे. CBI च्या म्हणण्यानुसार, कंपनीने एक्साइज डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना लाच दिली होती. नियम आणि कायदे तोडून हा भ्रष्टाचार केला आहे. एरिया आधारित टॅक्समध्ये मिळणाऱ्या सवलतीच्या नियमांचा गैरवापर केला आहे. कंपनीला आधीपासूनच जाणून होती की, हिमाचल प्रदेशमधील बद्दीमध्ये ज्या टॅक्स बेनिफीटचा ती फायदा उचलत आहे, त्यास कंपनी पात्र नाहीये. मात्र, तरीही कंपनीने जाणूनबुझून हा कारनामा केल्याचं CBI चं म्हणणं आहे.