हंचिनाळ येथे विहिरीत बुडून बालकाचा मृत्यू; खेळताना काळाचा घाला

 घरची मंडळी जाईर्यंत उशीर झाल्यामुळे वेदांत पाण्यात बुडाला होता

कोगनोळी : हंचिनाळ (ता. निपाणी) येथील कोडीमळ्यात वास्तव्यास असलेल्या बालकाचा खेळताना विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. वेदांत कृष्णात घाटगे (वय 8) असे मृत बालकाचे नाव आहे. शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी पडलेल्या बालकाचा मृतदेह शनिवारी (ता. १३) दुपारी विहिरीच्या बाहेर काढण्यात आला.


याबाबत अधिक माहिती अशी, वेदांत हा आपल्या आत्याचा मुलगा प्रज्वल (वय 8) याच्यासोबत आपल्या कोडी मळ्यात खेळत होता. तेथेच सुंदर जाधव यांची शेती व विहीर आहे. शुक्रवारी (ता. 12) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी दोन्ही मुले दुचाकीच्या रिकामी टायर फिरवत खेळत होती. खेळता खेळता वेदांत पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत पडला. त्यानंतर बुडून त्याचा मृत्यू झाला.


त्याच्यासोबत असलेल्या प्रज्वलने या प्रकाराने घाबरून घराच्या दिशेने धुम ठोकली. घरातील मंडळींना वेदांत विहिरीत बुडाल्याचे सांगितले. परंतु घरची मंडळी जाईर्यंत उशीर झाल्यामुळे वेदांत पाण्यात बुडाला होता.  घटनेची माहिती नातेवाईकांनी निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्यास दिली. पोलिस कर्मचारी चंदनशिवे, सूर्यवंशी यांच्यासह ग्रामपंचायत अध्यक्ष बबन हवालदार, ग्रामपंचायत सदस्य मारुती हवालदार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. परंतु, रात्री उशीर झाल्यामुळे शोध मोहीम शनिवारी सुरु ठेवली. आज अकरा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी गावातील युवकांच्या मदतीने मृतदेह विहिरी बाहेर काढला. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area