नागपूर : अवघ्या दोनशे रुपयांच्या वादातून रिक्षाचालकाची हत्या

 भाड्याच्या अवघ्या दोनशे रुपयांच्या रकमेवरून झालेल्या वादातून नवरा-बायकोने ऑटोचालकाची दगडाने ठेचून हत्या केली. शुक्रवारी हुडकेश्वरमधील आउटर रिंगरोडवरील या घटनेचा पर्दाफाश झाला.
नागपूर :

भाड्याच्या अवघ्या दोनशे रुपयांच्या रकमेवरून झालेल्या वादातून नवरा-बायकोने ऑटोचालकाची दगडाने ठेचून हत्या केली. शुक्रवारी हुडकेश्वरमधील आउटर रिंगरोडवरील या घटनेचा पर्दाफाश झाला.

अनिल हंसराज बर्वे (३२, नवनाथनगर, खरबी) असे मृत ऑटोचालकाचे नाव असून, अनंतराम लखन रज्जाक (वय २५) आणि त्याची पत्नी अनिता (वय २२, रा. दोघेही लुडियाडा, सागर, मध्य प्रदेश) असे मारेकरी पती-पत्नीचे नाव आहे.

ही घटना गुरुवारी सकाळी नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग, आउटर रिंगरोडवर उघडकीस आली. बर्वे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळावरील कागदपत्रांवरून पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविली. त्यानंतर सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता अनंतराम व अनिता हे त्याच्या ऑटोत बसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी याच परिसरात त्यांचा शोध घेतला असता ते एका निर्माणाधीन पेट्रोलपंपावर काम करताना दिसून आले. हुडकेश्वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतापसिंग भोसले, हवालदार दीपक मोरे, नायक पोलिस शिपाई राजेश मोते, शिपाई राजेश धोपटे, सायबर पाथकातील दीपक तऱ्हेकर, मिथुन नाईक यांनी या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान या पती-पत्नीने हत्येची कबुली दिली.

दारूत उडविले पैसे पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, हे दोघे बांधकाम कंत्राटदाराकडे कामाच्या शोधात होते. बुधवारी ते नागपूरच्या बसस्थानकावर उतरल्यानंतर त्यांनी काही खरेदी केली. अनंतराम उर्वरित पैशांची दारू प्यायला. पुढे ते ऑटोचालक बर्वेंना घेऊन कंत्राटदाराकडे गेले. मात्र, कंत्राटदाराकडे काम नसल्याचे कळले. त्यामुळे ते संतप्त झाले. काम मिळत नव्हते व दुसरीकडे ऑटोचालक बर्वे पैसे मागत होते. आपल्याकडे पैसे नसल्याचे त्यांनी बर्वेंना सांगितले. यावरून त्यांचे बर्वेंसोबत भांडण झाले. बर्वे त्यांची बॅग व मोबाइल हिसकावू लागले. त्यामुळे या दोघांनी दगडाने ठेचून त्यांचा खून केला. घटनेनंतर ते तेथून पळून गेले. रात्री एका पेट्रोलपंपाच्या बांधकामाच्या ठिकाणी काम मिळाले व ते तेथे राहू लागले, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area