'त्रास देणाऱ्या सुनेला वेगळ्या घरात ठेवा'

 सासू-सासऱ्याला त्रास देणाऱ्या सुनेला राहण्यासाठी भाड्याने वेगळे घर घेऊन देण्यात यावे; तसेच या घराचे भाडे दरमहा पतीने द्यावे, असा आदेश न्यायालयाने एका दाव्यात दिला आहे.
पुणे :

सासू-सासऱ्याला त्रास देणाऱ्या सुनेला राहण्यासाठी भाड्याने वेगळे घर घेऊन देण्यात यावे; तसेच या घराचे भाडे दरमहा पतीने द्यावे, असा आदेश न्यायालयाने एका दाव्यात दिला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. पी. परदेशी यांनी हा आदेश दिला.

संबंधित महिलेने पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत दावा दाखल केला होता. मात्र, तिच्याकडून वारंवार होणाऱ्या त्रासामुळे तिला भाड्याने वेगळे घर घेऊन देण्याची विनंती प्रतिवादीतर्फे न्यायालयात करण्यात आली होती. न्यायालयाने ही विनंती मान्य करून वयोवृद्ध सासू-सासऱ्यांना दिलासा दिला.

रमेश आणि सुजाता (दोघांची नावे बदलली आहेत) यांचा विवाह २०१७मध्ये मुंबईत झाला होता. त्यानंतर २०१९मध्ये सुजाताने पती रमेश आणि सासू-सासऱ्यांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा दावा दाखल केला होता. या दाव्यात अर्जदार सुजाताने दरमहा ५० हजार रुपयांची अंतरिम पोटगी मिळावी, अशी मागणी केली होती. एक कोटी रुपये कायमस्वरूपी मिळण्यासाठीही अर्ज दाखल केला होता.

न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला. पतीने पत्नीला दरमहा चार हजार रुपये देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. तिने सासू-सासऱ्यांशी वाद घालून त्यांच्याविरुद्ध 'भारतीय दंडविधान कायदा कलम ४९८-अ'द्वारे गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे पत्नीने सासू-सासऱ्यापासून वेगळे राहावे, अशी मागणी पती रमेशने अॅड. पुष्कर पाटील, अॅड. रेश्मा सोनार यांच्यामार्फत केली होती. पत्नी सुजाताने न्यायालयात फौजदारी प्रकिया संहिता 'कलम १२५'नुसार पोटगी मिळण्यासाठी आणखी एक दावा दाखल केला होता, तर पती रमेशने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.

अडचणी टाळण्यासाठी आदेश 

पती-पत्नी, सासू-सासऱ्यांमध्ये होणाऱ्या वादांमुळे पुढे अडचणी निर्माण होऊ नयेत; म्हणून अॅड. पुष्कर पाटील, अॅड. रेश्मा सोनार यांनी दाखल केलेला अर्ज स्वीकारून न्यायालयाने पत्नीला भाड्याने वेगळे घर घेऊन देण्याचा आदेश दिला. त्याचे भाडे दरमहा पतीने द्यावे, असा आदेश दिला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area