कोरेगाव पार्क, मुंढवा, कल्याणीनगर, विमाननगर आणि खराडी येथील हुक्का सुरू असलेल्या तब्बल २१ हॉटेल चालकांना पोलिसांनी तंबी दिली आहे. परत हुक्का सुरू झाल्यास हॉटेल व मद्द विक्रीचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
पुणे -
कोरेगाव पार्क, मुंढवा, कल्याणीनगर, विमाननगर आणि खराडी येथील हुक्का सुरू असलेल्या तब्बल २१ हॉटेल चालकांना पोलिसांनी तंबी दिली आहे. परत हुक्का सुरू झाल्यास हॉटेल व मद्द विक्रीचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. कल्याणीनगर येथील ‘ठेका’ या हॉटेलवर उत्पादन शुल्क विभागासह पोलिसांनी कारवाई करून, मद्य साठा, हुक्क्याची भांडी जप्त केल्याची माहिती येरवडा सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव यांनी दिली.
शहरातील हॉटेल्समध्ये राजरोसपणे हुक्का सुरू असल्याच्या बातम्या ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्याची गंभीर दखल घेत सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश दिले. कोरेगाव पार्कमधील हॉटेल्स चालकांना वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी लेखी सूचना देऊन हुक्का पार्लर बंद केले तर कल्याणीनगर येथील ‘ठेका’ व ‘ब्लर’ हॉटेलवर उत्पादन शुल्क विभाग आणि येरवडा पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली. ठेका हॉटेलचा परवाना रद्द करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र व्यवहार केल्याची माहिती जाधव यांनी दिली.
विमाननगर येथील सहा हॉटेल्स, खराडीतील तीन तर येरवड्यातील सात हॉटेल्सना हुक्का बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यांनी परत हुक्का सुरू केल्यास, त्यांचा हॉटेलचा परवाना रद्द करण्यासाठी पुणे महापालिका, उत्पादन शुल्क विभागाला कळविण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
हॉटेलमध्ये मिळणाऱ्या हुक्क्यात फ्लेवर व अमली पदार्थाचा खर्च शंभर ते दीडशे रुपये तर हुक्का ओढणाऱ्यांकडून नऊशे ते हजार रुपये घेतले जातात. त्यानंतर इतर खाद्य पदार्थ, पेयाचा खर्च वेगळाच असतो. त्यामुळे हिंजवडी, कोरेगाव पार्क अशा हॉटेलमध्ये हुक्का सुरू असल्यास वर्षाला १ कोटी रुपये सहज मिळतात, असे विमाननगर येथील हॉटेलमधील व्यवस्थापक एका बड्या ग्राहकाला गणित समजावून सांगत होता.
येरवडा, विमाननगर आणि चंदननगर पोलिस ठाण्यातील सर्व हॉटेल चालकांची नुकतीच बैठक घेतली. यामध्ये हुक्का बंद करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. - किशोर जाधव, सहायक पोलिस आयुक्त, येरवडा